मेरठ: अवैध धर्मांतर प्रकरणात यूपी एटीएसने ग्लोबल पीस सेंटरचे अध्यक्ष मौलाना कलीम सिद्दीकी यांना अटक केली आहे. यूपी एटीएसने मेरठ येथून मौलान कलीम सिद्दीकीला ताब्यात घेतलं. मौलाना जमीयत-ए-वलीउल्लाहचे अध्यक्षही आहेत. मौलाना कलीम हा उमर गौतमचा अगदी जवळचा व्यक्ती आहे.
लखनऊ एटीएसकडून चौकशी
एटीएसला मौलाना कलीम सिद्दीकीच्या कामावर संशय आला होता. मंगळवारी मौलाना कलीम मेरठमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. रात्री 9 वाजता नमाज झाल्यानंतर ते आपल्या साथीदारांसह पुन्हा गावाकडे निघाले. या दरम्यान एटीएसनं त्यांना ताब्यात घेतलं. मौलाना कलीम सिद्दीकीसह तीन मौलानांना आणि चालक सलीमलाही ताब्यात घेण्यात आलंय. लखनऊ एटीएसनं या चौघांची रात्रभर चौकशी केली. एजन्सी लवकरच या प्रकरणात मोठा खुलासा करू शकते.
संभलचा 'गाझींची भूमी' उल्लेख, ओवैसींच्या दौऱ्यापू्र्वी MIM चे पोस्टर वादाच्या भोवऱ्यात
परदेशातून फंडींग
एटीएसला तपासादरम्यान, मौलाना कलीम सिद्दीकीच्या ट्रस्टला परदेशातून 3 कोटी रुपये मिळाल्याची माहिती समोर आली आहे. यातील 1.5 कोटी रुपये बहरीन या देशातून आले. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी एटीएसच्या सहा पथकांची स्थापना करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश एडीजी (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी ही माहिती दिली.
उमर गौतमने केला खुलासा
उमर गौतमने चौकशी दरम्यान खुलासा केला होता की, त्याचा साथीदार मौलाना कलीम सिद्दीकीने गेल्या काही वर्षात 5 लाखांहून अधिक लोकांचे धर्मांतर केलं आहे. अल्पवयीन मुलांचे धर्मांतरणही आयडीसीच्या माध्यमातून केलं जात होतं. धर्मांतर झालेल्या व्यक्तींची नावे एटीएसने शोधली असता त्यात ख्रिश्चन 4 टक्के, शीख 0.75 टक्के आणि जैन व्यक्तीचांही समावेश आहे.