अयोध्येतील राम मंदिर निर्मितीसाठीच्या जमीन व्यवहारात घोटाळा झाल्याचा आरोप करणाऱ्यांनी देणगी दिल्याची पावती दाखवावी आणि दिलेली देणगी परत घेऊन जावी, असं विधान भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी केलं आहे. इतकंच नव्हे, तर जे नेते आरोप करतायत त्यांनी याआधी रामभक्तांवर गोळ्या चालवल्या होत्या, असाही घणाघात त्यांनी केला आहे.
"बाबरी मशिदीजवळ एक पाखरू देखील जाऊ देणार नाही असा उघड दावा करणाऱ्यांना खणखणीत उत्तर त्यावेळी देण्यात आलं होतं. राम जन्मभूमीवर आज एक भव्य मंदिर उभारलं जाणार आहे. त्यामुळे अशा वायफळ लोकांकडून कोणताही आधार नसलेले आरोप करण्याशिवाय दुसरं कोणतं काम शिल्लक राहिलेलं नाही", असं साक्षी महाराज म्हणाले.
श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष चंपत राय यांचीही त्यांनी बाजू लावून धरली. "चंपत राय यांनी त्यांचं संपूर्ण जीवन भगवान श्रीराम यांना समर्पित केलं आहे. अशा व्यक्तीवर आरोप करणं योग्य नाही. तरीही आम आदमी पक्षाच्या संजय सिंह यांनी राम मंदिरासाठी काही देणगी दिली असेल तर त्याची पावती त्यांनी दाखवावी आणि देणगी परत घेऊन जावी. अखिलेश यादव यांनी देणगी दिली असेल तर तेसुद्धा देणगी परत घेऊ शकतात. हे तेच लोक आहेत ज्यांनी राम मंदिराला कठोर विरोध केला होता", असं साक्षी महाराज म्हणाले.