नवी दिल्ली:नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सोमवारी लखीमपूर खीरी येथे झालेल्या हिंसाचारावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या एका ट्विटमध्ये उत्तर प्रदेशला "नवीन जम्मू-काश्मीर" म्हटले आहे. यूपीच्या लखीमपूरमध्ये झालेल्या घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाल्यामुळे राज्यभरात मोठा गोंधळ सुरू आहे.
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या दौऱ्यादरम्यान लखीमपूर खीरी जिल्ह्यातील तिकोनिया भागात झालेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह नऊ जण ठार झाले. यानंतर रविवारी परिसरात हिंसक संघर्ष झाला. या संपूर्ण प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांनी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्यासह 14 जणांविरुद्ध खून, गुन्हेगारी कट आणि बंडखोरी यासह अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी प्रियांका गांधींना घेतलं ताब्यात
या संपूर्ण वादानंतर अनेक नेत्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. दुसरीकडे, प्रियांका गांधींना सोमवारी सकाळी 5.30 च्या सुमारास सीतापूरमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलं. प्रियंका लखीमपूर खेरी जिल्ह्याच्या दिशेने पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात होत्या, यादरम्यान त्यांना थांबवून ताब्यात घेण्यात आलं. प्रियंका यांच्यासह अखिलेश यादव आणि इतर अनेक नेत्यांना पोलिसांनी विविध ठिकाणांवरुन ताब्यात घेतलं.
लखीमपूरमध्ये नेमकं काय झालं?उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या दौऱ्यावर शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान रविवारी लखीमपूर खीरी जिल्ह्यातील तिकोनिया भागात झालेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह नऊ जण ठार झाले. ही घटना तिकोनिया-बनबीरपूर रस्त्यावर घडली. उपमुख्यमंत्र्यांना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी जाणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांच्या दोन वाहनांनी आंदोलकांना कथितरीत्या धडक दिल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी दोन्ही वाहनांची जाळपोळ केली. या घटनेत चार शेतकरी आणि वाहनांवरील इतर चार लोकांचा मृत्यू झाला. केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि खेरीचे खासदार अजय कुमार मिश्रा यांचे मूळ गाव असलेल्या मण्य यांच्या बनबीरपूरच्या दौऱ्याला शेतकरी विरोध करत होते.