इटावा : उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यात पोलिसांच्या तप्तरतेमुळे मोठी दुर्घटना टळली. येथील लखनऊ- आग्रा महामार्गावर एक व्यक्ती आपल्या कुटुंबीयांसमवेत दुचाकीवरुन जात होता. त्यावेळी त्याच्या दुचाकीने अचानक पेट घेतला. मात्र, दुचाकीने पेट घेतल्याचे त्या व्यक्तीला समजले नाही, तो सुसाट गाडी चालवत होता. त्यावेळी दुचाकीने पेट घेल्याचे महामार्गावर पेट्रोलिंग करण्याऱ्या उत्तर प्रदेशपोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी दुचाकीचा जवळपास 4 किलोमीटर माग घेत त्याल्या थांबविले आणि दुचाकीला लागलेली आग विझविली.
मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊ-आग्रा महामार्गावर दुचाकीस्वार वेगाने गाडी चालवत होता. त्याच्यासोबत पत्नी आणि मुलगा होता. यावेळी त्याच्या दुचाकीला अचानक आग लागल्यामुळे बाजूला असलेली बॅग जळत होती. मात्र, या दुचाकीस्वाराला आग लागल्याचे समजले नाही. तो सुसाटच होता. यादरम्यान, महामार्गावर पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना दुचाकीला आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी दुचाकीस्वाराला आवाज देत आग लागल्याची माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुचारीस्वाराला पोलिसांचा आवाज ऐकू गेला नाही, कारण तो वेगाने गाडी चालवत होता. त्यानंतर पोलिसांनी जवळपास 4 किलोमीटर अंतराचा माग घेत दुचाकीस्वाराला थांबविले आणि दुचाकीला लागलेली आग विझविली.
दरम्यान, पोलिसांच्या तप्तरतेमुळे मोठी दुर्घटना टळली. तसेच, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. उत्तर प्रदेश पोलिसांनी यासंदर्भातील व्हिडीओ आपल्या ट्विटर पेजवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.