उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे शनिवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे. यानंतर गोरखपूरच्या एसएसपींनी मोठी कारवाई केली आहे. मुख्यमंत्री योगी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या स्वागतासाठी विमानतळावर जात असताना ही चूक झाली. सुरक्षा व्यवस्थेत निष्काळजीपणा केल्याबद्दल एसएसपींनी आठ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
यासंदर्भात बोलताना एसएसपी म्हणाले, शनिवारी गोरखपूरमध्ये सीएम योगी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या नियोजित कार्यक्रमानिमित्त पोलीस कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली होती. सीएम योगी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे गोरखपूर विमानतळावर स्वागत करण्यासाठी जात होते. याच वेळी विमानतळाच्या गेटवर ड्युटीवर असलेल्या आठ पोलीस कर्मचाऱ्यांनी कुसम्हीकडून येणारी वाहने चुकीच्या दिशेने वळवली.
यामुळे ती वाहने योगींच्या ताफ्यासमोर आली. यामुळे सीएम योगींच्या ताफ्याला विमानतळाच्या गेटमध्ये प्रवेश करताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. यानंतर कामातील निष्काळजीपणामुळे एसएसपींनी या आठ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबन केले आहे.
या पोलीस कर्मचाऱ्यांना करण्यात आले निलंबित -एसएसपींनी ज्या आठ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे, त्यांत निरीक्षक यदुनंदन यादव, उप निरीक्षक अजय कुमार राय, आरक्षी ब्रजेश कुमार यादव, सत्येन्द्र कुमार यादव, विवेक कुमार मिश्रा, सुजीत यादव, महिला कॉन्स्टेबल अरुणिमा मिश्रा आणि किरन चौधरी यांचा समावेश आहे.