लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांत भाजप बहुमत मिळवून पुन्हा सत्तेत कायम राहणार असला तरी त्या पक्षाच्या जागा खूप कमी होतील आणि त्या मिळवून समाजवादी पक्ष दुसऱ्या स्थानावर राहील, असे जनमत चाचणीत आढळून आले आहे.
टाइम्स नाऊ - पोलस्टार्टच्या जनमत चाचणीच्या निष्कर्षात म्हटले आहे की, विधानसभेच्या ४०३ जागांपैकी भाजप २३९ ते २४५ जागा जिंकेल, तर समाजवादी पक्षाला ११९ ते १२५ जागांवर विजय मिळेल. गेल्या, २०१७च्या निवडणुकांच्या तुलनेत सपला दुप्पट जागा मिळतील. बहुजन समाज पार्टीची मते मोठ्या प्रमाणावर भाजप व सपकडे वळतील. बसपाला सुमारे ३० जागा, तर काँग्रेसला केवळ ५ ते ८ जागा मिळू शकतील. हे निष्कर्ष बरोबर ठरल्यास योगी आदित्यनाथ सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील. बळजबरीने होणारे धर्मांतरे रोखण्यासाठी केलेल्या कारवाईपेक्षा कायदा-सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्यासाठी योगी आदित्यनाथ यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेला जनतेने अधिक पसंती दर्शविली आहे. शेतकरी आंदोलनात उत्तर प्रदेशमधील शेतकरी मोठ्या प्रमाणात उतरले आहेत. पण या चाचणीत त्याबाबतचा प्रश्न नव्हता. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत या जनमत चाचणीत लोकांनी संमिश्र मते व्यक्त केली. योगी आदित्यनाथ जातीयवाद वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत अशी टीका काही जणांनी केली. समाजवादी पक्ष व काँग्रेस मुस्लिमांचा अनुनय करत आहे हा भाजपचा आरोप योग्य असल्याचे मत काही जणांनी व्यक्त केले आहे. या जनमत चाचणीसाठी नऊ हजार लोकांची मते विचारात घेण्यात आली.
काँग्रेसला ६ ते १० जागा?उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकांबाबत सी-व्होटरने केलेल्या स्वतंत्र सर्वेक्षणात म्हटले आहे की, भाजपला २१३ ते २२१, तर सपला १५२ ते १६० जागा मिळण्याची शक्यता आहे. बसपला १६ ते २० व काँग्रेसला फक्त ६ ते १० जागांवरच समाधान मानावे लागेल.