नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा स्वबळावर मैदानात उतरणार आहे. कुठल्याही पक्षासोबत निवडणूकपूर्व किंवा निवडणुकीनंतर युती करणार नाही. तसेच राममंदिराचा मुद्दाही उपस्थित करणार नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी दिले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यामध्ये भाजपाला शानदार विजय मिळवून देण्यात महेश शर्मा यांचा मोठा वाटा समजला जातो. आसाममध्ये मिळालेल्या विजयाने उत्साहित झालेल्या भाजपाने पुढील वर्षी उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर आता लक्ष केंद्रित केले आहे.शर्मा म्हणाले की, या देशातील नागरिकांना अयोध्येत राममंदिर हवे आहे, पण ते सर्वसंमतीने किंवा न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारे व्हावे, अशी आमची भूमिका आहे. उत्तर प्रदेशात भाजपाला ४०३ पैकी २६५ जागा मिळतील, असा दावाही शर्मा यांनी केला.जर राज्यात पक्ष सत्तेवर आला तर तुम्ही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहात काय, असा प्रश्न केला असता शर्मा म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि पक्षनेतृत्व जी जबाबदारी देईल ती सांभाळण्याची माझी तयारी आहे. प्रचारात मुख्य मुद्दे विकास, चांगले प्रशासन आणि भ्रष्टाचाराचा नायनाट हे असतील, राममंदिर नव्हे. ते म्हणाले की, राममंदिराची निर्मिती ही लाखो नागरिकांची इच्छा आहे. आम्ही याला राजकीय मुद्दा बनविणार नाही. या देशातील नागरिकांना अयोध्येत राममंदिर हवे आहे.
‘उत्तर प्रदेशात भाजपा स्वबळावरच लढणार’
By admin | Published: May 30, 2016 3:12 AM