बुलंदशहर(युपी): उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सर्पदंशामुळे(Snake Bite) मरण पावलेल्या तरुणाला जिवंत करण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी त्याचा मृतदेह दोरीने बांधून गंगेच्या पाण्यात दोन दिवस लटकवला. दोन दिवसानंतरदेखील तरुण जिवंत न झाल्याने अखेर त्याच्यावर गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंधश्रद्धेच्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. प्रशासनाने मात्र याबाबत अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण अहार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयरामपूर कुडैना गावातील आहे. 26 एप्रिल 2004 रोजी 20 वर्षीय मोहित शेतात गेला होता, तिथे त्याला साप चावला. यानंतर कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात नेले, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. यानंतर कुटुंबीयांनी त्याच्यावर दुसऱ्या डॉक्टरांकडून उपचार करून घेतले. पण तरीही काही उपयोग झाला नाही. मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
यानंतर काही अंधश्रद्धाळू लोकांनी मोहितला जिवंत करण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांना एक अघोरी प्रकार सांगितला. गंगेच्या पाण्याने सापाच्या विषाचा प्रभाव नाहीसा होऊन मृत व्यक्ती जिवंत होऊ शकतो, असे मोहितच्या कुटुंबीयांना सांगण्यात आले. यानंतर मुलाला जिवंत करण्याच्या भाबड्या आशेने मोहितच्या कुटुंबीयांनी त्याचा मृतदेह घेऊन गंगा नदी गाठली. यानंतर दोरीने बांधून मोहितचा मृतदेह गंगेत लटकवला.
हे दृष्य पाहण्यासाठी शेकडो लोक जमा झाले होते. मीडिया रिपोर्ट्स नुसार, दोन दिवस मोहितचा मृतदेह तशाच अवस्थेत लटकवून ठेवण्यात आला होता. दोन दिवस होऊनही मोहित जिवंत न झाल्यामुळे अखेर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दरम्यान कुणीतरी या घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.