उत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मुद्द्यावरून आता काँग्रेस नेते राहुल गांधी आणि बसपा नेत्या मायावती यांच्यात चांगलेच वाकयुद्ध सुरू झाल्याचे दिसत आहे. नुकतेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मायावतींवर निशाणा साधताना, त्यांनी तर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढलीच नाही, असे म्हटले होते. यावर आता मायावती यांनीही पलटवार करत, आपले विखुरलेले घर तर सांभाळता येईना अन् आमच्यासंदर्भात बोलत आहेत, असे म्हटले आहे.
यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना मायावती म्हणाल्या, काँग्रेस सुरुवातीपासूनच घाणेरडे राजकारण करते. मी उत्तर दिले नाही, असे राहुल गांधी यांचे म्हणणे आहे, हे चुकीचे आहे. यात कसल्याही प्रकारचे तथ्य नाही. खरे तर, काँग्रेसने इतर पक्षांची चिंता करण्यापेक्षा स्वतःची चिंता करावी, असा चिमटाही मायावती यांनी काढला.
आमच्या पक्षाची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. खरे तर, निवडणुकीनंतर प्रत्येक विरोधी पक्षाने आलेल्या निकालांवर समीक्षा करायला हवी. मात्र, असे बोलू नये. काँग्रेसने बसपासंदर्भात काहीही बोलण्यापूर्वी 100 वेळा विचार करायला हवा. याच बरोबर, भाजपसोबत सामना करताना, आपली कामगिरी कशी राहिली, हेही काँग्रेसने बघायला हवे, असेही मायावती म्हणाल्या.
राहुल यांच्या वक्तव्यावर बोलताना मायावती म्हणाल्या, राजीव गांधी यांनीही बसपला बदनाम करण्यासाठी आणि कमकुवत करण्यासाठी कांशीराम यांना सीआयए एजंट म्हटले होते. आता त्यांचा मुलगाही त्यांच्याच मार्गावर चालत, असे आरोप करत आहे. खरे तर, काँग्रेसला भाजपच्या सेंट्रल एजन्सीची भीती वाटते. असेही त्या म्हणाल्या.