नवी दिल्ली- अहमदाबाद ते मुंबई असा बुलेट ट्रेनचा कागदावर प्रस्ताव असला तरी तिला होणारा विरोध पाहाता भारतात बुलेट ट्रेन कधी येईल हे सांगता येत नाही. वेगवान ट्रेनमध्ये बसून काही तासांमध्ये दोन राज्यांमधले अंतर काटायचे हे भारतीयांचे स्वप्न लवकर पूर्ण होईल असे सध्या तरी दिसत नाही. मात्र उत्तर प्रदेशात मात्र सध्या अस्तित्त्वात असणाऱ्या रेल्वेलाच बुलेटच्या वेगाने चालवून तिचीच बुलेट ट्रेन करण्याचा प्रयत्न रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.उत्तर प्रदेशात काही रेल्वे बुलेट ट्रेनच्या वेगाने धावल्याची नोंद करण्यात आली असून कॅगच्या तपासणीमध्ये ही सगळी कागदावरची धावाधाव समोर आली आहे, रेल्वेने ठेवलेल्या वेगाच्या नोंदीमध्ये प्रचंड प्रमाणात अफरातफर झाल्याचे दिसून आले. अलाहाबाद दुरांतो एक्सप्रेस, जयपूर-अलाहाबाद एक्सप्रेस, प्रयागराज एक्सप्रेस या रेल्वेगाड्यांचे ऑडिट कॅगने केले. त्यामध्ये हा सर्व बेबनाव लक्षात आला आहे. 7 जुलै 2016 रोजी अलाहाबाग दुरांतो एक्सप्रेस फतेहपूर स्थानकावर सकाळी 5 वाजून 53 मिनिटांनी पोहोचली. आणि अलाहाबादमध्ये सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी. म्हणजे या दोन स्थानकांमधील 117 किमीचे अंतर रेल्वेने केवळ 17 मिनिटांत पूर्ण केल्याची नोंद कागदावर झालेली आहे. जर तसे प्रत्यक्षात झाले असते तर या रेल्वेचा वेग 409 किमी प्रतीतास होतो. मात्र प्रत्यक्षात ही रेल्वे कमाल 130 किमी वेगाने धावू शकते. जर कमाल 130 किमी वेगाने जरी रेल्वेने प्रवास केला असता तरीही या अंतरासाठी 53 मिनिटांचा अवधी लागला असता.जयपूर अलाहाबद एक्सप्रेसच्या बाबतीतही असेच झाले असून 10 एप्रिल 2017 रोदी फतेहपूरला सकाळी 5 वाजून 56 मिनिटांनी आलेली ही ट्रेन अलाहाबादला सकाळी 5 वाजून 31 मिनिटांनी म्हणजे त्यावेळेच्या कितीतरी आधी पोहोचल्याचे दाखविण्यात आले. आता हे घड्याळाचे काटे उलटे कसे फिरले याचे उत्तर रेल्वे अधिकाऱ्यांनाच विचारायला हवे.कॅगच्या मते असे गोंधळ रेल्वेच्या इतर विभागांमध्येही झाले असावेत. तर रेल्वे अधिकारी ही मानवी चूक असल्याचे सांगत आहेत.
उत्तर प्रदेशात अवतरली बुलेट ट्रेन, ताशी 409 किमी वेगाने धावली रेल्वे?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 3:38 PM