कन्नौज (उत्तर प्रदेश) - प्रवासी बस आणि मालवाहू ट्रक यांच्यात भीषण टक्कर होऊन झालेल्या अपघातात 20 जणांचा मृत्यू झाला. तर सुमारे 21 जण जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी रात्री उत्तर प्रदेशातील कन्नौजमध्ये घडला. अपघातग्रस्त बस कन्नौजमधील गुरसहायगंज येथून जयपूरला जात होती. मात्र वाटेत झालेल्या भीषण अपघातानंतर बसला आग लागली. अपघाताची तीव्रता आणि लागलेली आग इतकी भीषण होती की त्यामुळे बसमधून प्रवास करत असलेल्या अनेक प्रवाशांना बसमधून बाहेरही पडता आले नाही.
हा अपघात शुक्रवारी रात्री साडे नऊच्या सुमारास घडला. अपघातानंतर बस आणि ट्रकला आग लागली. त्यामुळे बसमध्ये अडकलेले प्रवासी बाहेर पडू शकले नाहीत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पूर्णपणे जळून गेले आहेत. त्यामुळे त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. आता डीएनए चाचणी करून मृतांची ओळख पटवावी लागेल. त्यानंतरच मृतांचा आकडा समोर येऊ शकतो, असे कानपूरचे रेंजचे आयजी मोहित अग्रवाल यांनी सांगितले.
अपघाताबाबत अधिक माहिती देताना उत्तर प्रदेशचे जिल्हाधिकारी रवींद्र कुमार यांनी सांगितले की, ''अपघातग्रस्त बसमधून एकूण 43 प्रवासी प्रवास करत होते. या अपघातात 21 जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसमधून प्रवास करत असलेल्या प्रवाशांपैकी 26 प्रवासी हे गुरसहायगंज आणि 17 प्रवासी हे छिबरामऊ येथून प्रवास करत होते.''
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघाताबाबत दु:ख व्यक्त केले आहे. तसेच अपघातात जखमी झालेल्यांना सर्वतोपरी मदत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याबरोबरच जखमींना प्रत्येकी 50 हजार आणि मृतांना प्रत्येकी दोन लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे.