लखनऊ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेल्या कमल राणी यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. १८ जुलैला कमल राणी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. लखनऊमधल्या एसजीपीजीआय रुग्णालयात राणी यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कमल राणी वरुण योगी सरकारमध्ये तंत्रशिक्षण मंत्री होत्या. त्यांची प्रकृती बिघडल्यानं गेल्या महिन्यात त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. १८ जुलैला त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना एसजीपीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे त्यांच्यावर उपचार होते. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली. कमल राणी वरुण यांचा जन्म ३ मे १९५८ रोजी लखनऊमध्ये झाला. कानपूरला राहणाऱ्या किशन लाल वरुण यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. किशन लाल एलआयसीमध्ये प्रशासकीय अधिकारी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. १९७७ मध्ये कमल राणी यांनी राजकारणात प्रवेश केला. मतदारपत्रिकेचं काम करण्यासापासून त्यांची राजकीय वाटचाल सुरू झाली. सुरुवातीला त्यांनी गरीब वस्त्यांमध्ये काम केलं. सेवा भारतीच्या केंद्रातल्या मुलांना शिकवायचं काम त्यांनी केलं. गरीब महिलांना शिलाईचं कौशल्य त्यांनी शिकवलं.
CoronaVirus News: उत्तर प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री कमल राणी यांचं कोरोनामुळे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2020 11:50 AM