लखनौ-
पाच वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर यूपीमध्ये पुन्हा एकदा योगी सरकार विराजमान होण्यासाठी सज्ज झालं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा दुसरा शपथविधी सोहळा होणार येत्या २५ मार्च रोजी होणार आहे. २५ मार्च रोजी शहीद पथ येथील एकना स्टेडियमवर भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात येणार आहे. या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह इतर मंत्रीही शपथ घेणार आहेत. मंत्रिमंडळात महिला आणि तरुणांवर विशेष लक्ष असेल. दुपारी ४ वाजता शपथविधी सोहळा होणार आहे.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि अनेक केंद्र सरकारचे मंत्री, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्र आणि भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. एकना स्टेडियमवर प्रस्तावित शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. मंत्रिमंडळाच्या स्वरूपाबाबत योगींच्या पक्षनेतृत्वाशी चर्चा झाली आहे. यूपीमध्ये सरकार स्थापनेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांना अनुक्रमे निरीक्षक आणि सहनिरीक्षक बनवण्यात आले आहे. मुख्यमंत्री गोरखपूरहून लखनौला पोहोचल्यावर शपथ घेणार्या मंत्र्यांची यादी निश्चित केली जाईल.
योगी मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यासाठी बसपा सुप्रीमो मायावती, सपाचे संरक्षक मुलायम सिंह यादव, सपा अध्यक्ष अखिलेश यादव, काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही आमंत्रित केले जाणार आहे. यासोबतच केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांनाही आमंत्रित करण्यात येणार आहे. या लाभार्थ्यांमध्ये महिलांचाही भरीव सहभाग असेल.