“गर्व है कि हम हिंदू हैं!”; राहुल गांधी यांच्या विधानावरुन योगी आदित्यनाथ यांचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 06:43 PM2024-07-01T18:43:14+5:302024-07-01T18:44:57+5:30
Yogi Adityanath Replied Rahul Gandhi: स्वतःला एक्सीडेंटल हिंदू म्हणवणाऱ्यांच्या युवराजांना हिंदुत्व कसे काय समजणार, असा थेट सवाल योगी आदित्यनाथ यांनी केला.
Yogi Adityanath Replied Rahul Gandhi: संसदेचे अधिवेशन सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत मुसंडी मारलेल्या विरोधकांचा आत्मविश्वास दुपटीने वाढला आहे. विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच नीट आणि नेट परीक्षेतील गोंधळ, पेपरफुटी यांवरून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदीय अधिवेशनादरम्यान केलेल्या अभिभाषणावर लोकसभेत झालेल्या चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी भाजपाच्या हिंदुत्वावर टीका केली. याला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
भाजपाने हिंदुत्त्वाच्या नावावर देशात भीतीचे वातावरण पसरवले आहे. अयोध्येने भाजपाला संदेश दिला आहे. रामभक्तांनी भाजपाला संदेश दिला आहे. आपला देश अंहिसेचा देश आहे. अहिंसा हिंदूंचे प्रतीक आहे. परंतु, सध्या सत्तेत असलेले हिंदू नाहीत. दुसरीकडे स्वतःला हिंदू म्हणवून घेणारेच चोवीस तास हिंसाचार, असत्य आणि द्वेषात गुंतलेले असतात. मोदी म्हणजे हिंदू समाज नाही, भाजपा म्हणजू पूर्ण हिंदू समाज नाही, आरएसएस म्हणजे हिंदू समाज नाही, अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी केली. यानंतर योगी आदित्यनाथ यांनी एक्सवर एक पोस्ट करत राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले.
गर्व है कि हम हिंदू हैं!
भारताचा मूळ आत्मा हिंदू आहे. हिंदू सहिष्णुता, उदारता आणि कृतज्ञतेचे मूर्तिमंत उदाहरण आहे. हिंदू असल्याचा आम्हाला अभिमान आहे. मुस्लीम तुष्टीकरणाच्या राजकारणात आकंठ बुडालेले आणि स्वतःला एक्सीडेंटल हिंदू म्हणवणाऱ्यांच्या युवराजांना ही बाब कशी काय समजणार? राहुल गांधी यांनी जगभरातील कोट्यवधी हिंदू लोकांची माफी मागायला हवी. तुम्ही एका समुदायाला नाही, तर भारताच्या आत्म्यावर हल्लाबोल केला आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदी अयोध्येतून निवडणूक लढवण्याचा विचार करत होते. त्यांनी दोन वेळा सर्वेक्षणही केले. मात्र मोदी अयोध्येतून निवडणुकीला उभे राहिले असते तर ते तिथून पराभूत झाले असते. भाजपाच्या अंतर्गत सर्वेक्षणातही तेच म्हटले आहे. तुम्ही लिहून घ्या, गुजरातमध्ये तुम्हाला पराभूत करू, असे आव्हान राहुल गांधी यांनी दिले.