Yogi Adityanath Vs Thackeray Group: २२ तारखेला राम मंदिर रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. यासाठी प्राथमिक धार्मिक विधी, अनुष्ठान, पूजा-पाठ यांना सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील दिग्गज, मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. राम मंदिरावरून राजकारणही अधिकच तापल्याचे पाहायला मिळत आहे. राम मंदिराच्या जागेवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विरोधकांच्या या टीकेला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर दिले आहे.
भाजपावाल्यांनी राम मंदिराची जागा बदलली. रामललाची मूळ जन्मभूमी ही बाबरी मशीद परिसर आहे. मात्र, आताचे राम मंदिर हे मूळ जागी बांधले जात नाही, असा मोठा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह अन्य विरोधकांकडून केला जात आहे. विरोधकांच्या या आरोपाला योगी आदित्यनाथ यांनी उत्तर दिले. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा उल्लेख करत योगी आदित्यनाथ यांनी थेट विचारणा केली आहे.
संजय राऊत-उद्धव ठाकरेंनी आपला अमूल्य सल्ला तेव्हा का दिला नाही
एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, विरोधकांकडून केले जात असलेले दावे आणि आरोप चुकीचे आहेत. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे स्वतः अयोध्येला दर्शनासाठी आले होते. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत अयोध्येला आले होते, तेव्हा त्यांनी आपला अमूल्य सल्ला का दिला नाही, असा प्रतिप्रश्न योगी आदित्यनाथ यांनी केला.
दरम्यान, अयोध्येनंतर आता काशी आणि मथुरा या ठिकाणी भाजपा आपले वचन पूर्ण करणार का, असा प्रश्न योगी आदित्यनाथ यांना करण्यात आला होता. यावर बोलताना योगी आदित्यनाथ यांनी सविस्तर उत्तर दिले. हा विषय न्यायप्रविष्ट आहे. राम मंदिरासाठी ५०० वर्ष संघर्ष केला आहे. संयमित पद्धतीने आम्ही न्यायालयीन लढाई लढून विजय मिळवला आणि त्यानंतरच आता रामलला प्राणप्रतिष्ठा केली जात आहे. न्यायालयाच्या माध्यमातून अन्य ठिकाणचे मुद्देही सोडवले जातील. प्रभू श्रीकृष्णांची इच्छा असेल, तेव्हा तारखाही येतील आणि न्यायही मिळेल, असे योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले.