लखनौ - उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतःच ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली. सुरुवातीची लक्षणे दिसून येताच मी कोरोना टेस्ट केली आणि माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (Uttar Pradesh CM Yogi Adityanath Tests Positive For Coronavirus)
मी सेल्फ आयसोलेशनमध्ये आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पूर्णपणे पालन करत आहे. सर्व कामे व्हर्च्युअली सुरू आहेत. तसेच राज्य सरकारची सर्व कामे सर्वसामान्यपणे सुरू आहेत. यादरम्यान जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनीही आपली तपासणी करून घ्यावी आणि खबरदारी बाळगावी. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी 5 मार्चला कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता.
वेगाने पसरत असलेल्या कोरोना व्हायरसने मुख्यमंत्री कार्यालयालाही आपल्या विळख्यात घेतले आहे. मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या जवळील अधिकारी अतिरिक्त मुख्य सचिव शशी प्रकाश गोयल, विशेष सचिव अमित कुमार सिंह, ओएसडी अभिषेक कौशिक तसेच एका पर्सनल सेक्रेटरी आणि एका पर्सनल असिस्टंटलाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतःला आयसोलेट करून घेतले होते.कोरोना मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांसोबत राहणाऱ्या अधिकाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याने मुख्यमंत्री कार्यालयापासून ते त्यांच्या सरकारी निवासस्थानापर्यंत सतर्कता बाळगली जात आहे. प्रशासन आणि सरकारमध्ये अत्यंत महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या अनेक महत्वाच्या अधिकाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.