राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कानपूर दौऱ्यावर असतानाच, येथे झालेल्या हिंसाचारानंतर, आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्ट्रिक्ट अॅक्शन घेण्याच्या तयारीत आहेत. सीएम योगींनी आरोपींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. आरोपींवर गँगस्टर अॅक्ट लावण्याची तसेच बुलडोझर चालविण्याची तयारीही सुरू झाली आहे. एवढेच नाही, तर संबंधित हुल्लडबाजांची मालमत्ताही जप्त करण्यात येणार आहे.
या हिंसाचारानंतर आतापर्यंत 18 जणांना अटक करण्यात आली आहे. व्हिडिओच्या आधारे इतरांचा शोध सुरू आहे. संबंधित भागात अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला असून 12 कंपन्या आणि एक प्लाटून पीएसी पाठवण्यात आले आहे.
कानपूर येथील चकेरी विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निरोप दिल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथेच मुख्य सचिव दुर्गाशंकर मिश्रा आणि डीजीपी डीएस चौहान यांच्याकडून हिंसाचारासंदर्भात माहिती घेतली. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी, एकही दोषी सुटणार नाही, अशा पद्धतीने दंगलखोरांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. एवढेच नाही, तर त्यांनी अतिरिक्त मुख्य सचिव अवनीश अवस्थी यांनाही फोन करून हुल्लडबाजांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
डीजीपींना सूचना देताना योगी म्हणाले, हुल्लडबाजांची ओळख पटल्यानंतर त्यांच्यावर गँगस्टरची कारवाई करा, त्यांच्यावर कठोराती कठोर कलमे लावा आणि त्यांची मालमत्ता जप्त करून त्यांच्यावर रासुका अंतर्गतही कारवाई करा, जेणेकरून भविष्यात कोणी हुल्लडबाजी करण्याचा विचारही मनात आणणार नाही.