उत्तर प्रदेशात महानगर पालिकांच्या निवडणूक प्रचाराला वेग आला आहे. या निवडणुकीतही भाजप कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर विरोधकांना घेरत आहे. नुकत्याच मारल्या गेलेल्या अतिक अहमदवरील कारवाई संदर्भातील अजेंड्याला धार देण्यात भाजप गुंतला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी भाजपच्या वतीने प्रचाराला सुरुवात केली. त्यांनी विकास आणि राष्ट्रवादासह माफियांच्या दुर्दशेवरही भाष्य केले.
एका हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, राजकीय विश्लेषक प्रसून पांडे म्हणाले, निवडणुकीत मुद्दे कशा पद्धतीने मांडायला हवे, हे भाजपला चांगल्या प्रकारे माहित आहे. लोकसभा निवडणूक असो, की विधानसभा निवडणूक, भाजपने कायदा आणि सुव्यवस्था हा महत्त्वाचा मुद्दा बनवून सत्ता उलथवली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडेही प्रचाराचा प्रचंड अनुभव आहे. यामुळे त्यांना विरोधकांना चोख प्रत्युत्तर कसे द्यायचे हे माहीत आहे. एवढेच नाही, तर पश्चिम यूपीमध्ये प्रचाराला सुरू करताना माफिया मुख्तार आणि अतिकच्या गुंडांवर कारवाईमुळे निर्माण झालेल्या वातावरणाचे योग्य प्रकारे भांडवल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही पांडे यांनी म्हटले आहे.
माफियांवर दोन अश्रू ढाळणारेही उरलेले नाहीत - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या भाषणात, "नो कर्फ्यू नो दंगा, यूपी में सब चंगा" असे म्हणत, राज्यातील बळकट कायदा आणि सुव्यवस्थेकडे जनतेचे लक्ष आकर्षित केले होते. ते म्हणाले आता उत्तर प्रदेशात माफियांवर दोन अश्रू ढाळणारेही उरलेले नाहीत. उत्तर प्रदेशात माफियांचा ढोल वाचून त्यांना रसातळाला नेण्याचे काम करण्यात आले आहे. याच बरोबर, "आता उपद्रव नव्हे, तर उत्सव आमची ओळख आहे आणि माफिया नव्हे, तर मोहोत्सव आमची ओळख आहे, असेही योगी म्हणाले. गेल्या सरकारवर आरोप करताना योगी म्हणाले, "2017 पूर्वीच्या सरकारला दंगली घडवण्यापासून वेळच मिळत नव्हता. मात्र आता, उत्तर प्रदेशात कुठेही कर्फ्यू नाही. आता तर कावड यात्राही सुरू झाली आहे. यापूर्वी तरूणांवर खोट्या केसेस केल्या जात होत्या. पूर्वी मुलींनाही घरातून बाहेर पडायची भीती वाटायची. मात्र आता उत्तर प्रदेशात भयमुक्त झाला आहे.''