लखनऊ- उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काल रात्री उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधल्या गोमती नगर या उच्चभ्रू परिसरात उत्तर प्रदेशच्या पोलीस कॉन्स्टेबलनं अॅपलच्या मॅनेजरची गोळ्या घालून हत्या केली आहे. पोलीस कॉन्स्टेबलच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले विवेक तिवारी हे अॅपल कंपनीमध्ये मॅनेजर आहेत.विशेष म्हणजे सहका-याला सोडण्यास गेले असताना विवेकची गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. काल रात्री उशिरा विवेक स्वतःच्या सहका-याला बरोबर घेऊन कामावरून घरी परतत होता. त्याच दरम्यान गोमतीनगर परिसरात दोन पोलिसांनी त्याला गाडी थांबवण्याचा इशारा केला. परंतु विवेकनं गाडी थांबवली नाही. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या गाडीवर गोळीबार केला, त्या गोळीबारात एक गोळी विवेकच्या डोक्यातून आरपार गेली आणि विवेकचा मृत्यू झाला.या प्रकरणात कॉन्स्टेबल प्रशांत चौधरी याला अटक केली आहे. घटनास्थळी गाडीमध्ये उपस्थित असलेल्या सना खाननं सांगितलं की, मी माझ्या सहका-याबरोबर घरी जात होती. त्याचं नाव विवेक तिवारी आहे. गोमती नगरजवळ आमची गाडी उभी होती. त्याच वेळी दोन पोलीस समोरून आले म्हणून आम्ही त्यांची नजर चुकवून तिकडून निघण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अचानक गोळीबार करण्यात आला. आम्ही गाडी वेगानं दामटण्याचा प्रयत्न केला. पुढे आमची गाडी एका दिवाळाला धडकली आणि विवेकच्या डोक्यातून रक्तस्रावास सुरुवात झाली. मी सगळ्यांकडे मदतीची याचना केली. त्यावेळी पोलीस आले आणि त्यांनी विवेकला रुग्णालयात दाखल केलं. परंतु तोपर्यंत विवेकचा मृत्यू झाला होता.
अॅपलच्या मॅनेजरला पोलिसांनी घातल्या गोळ्या, कार न थांबवल्यानं आला संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 12:42 PM