अयोध्येमधील एका गावामध्ये २२ वर्षीय दलित तरुणीचा विवस्त्रावस्थेतील मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही तरुणी शुक्रवारी संध्याकाळपासून बेपत्ता होती. आज सकाळी तिचा मृतदेह गावाबाहेर एका नाल्याजवळ सापडला. या तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. या तरुणीच्या नातेवाईकांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. मात्र पोलिसांनी कुठलाही तपास केला नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. सकाळी शेतामध्ये रक्ताने माखलेले कपडे सापडले तेव्हा त्यांच्या मनात असलेली शंका खरी ठरली. त्यानंतर गावाबाहेरील नाल्याजवळ या तरुणीचा मृतदेह सापडला.
मृत तरुणीच्या वडिलांनी सांगितले की, आमच्या मुलीचे कपडे शेतात पडले आहेत, याची माहिती आम्हाला सुमारे १२ वाजण्याच्यादरम्यान मिळाली. जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा आम्ही त्यांची ओखळ पटवली. त्यादरम्यान, शाळेमध्येही रक्त पडलेलं असल्याची माहिती कुणीतरी दिली. तेव्हा आमच्या मुलीचा कुणीतरी खून केल्याची आमची खात्री पटली. आम्हाला पोलिसांकडून न्याय हवा आहे. ज्याने कुणी हा गुन्हा केला आहे तो लवकरात लवकर पकडला गेला पाहिजे.
पोलीस अधिकारी सीईओ आशुतोष तिवारी यांनी या घटनेबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, २२ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार आम्हाला मिळाली होती. आम्ही शोधमोहीम हाती घेतली आणि त्यात एक मृतदेह सापडला. हा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. आता शवविच्छेदनाच्या अहवालाच्या आधारावर पुढील कारवाई करण्यात येईल.
दुसरीकडे नातेवाईकांनी सांगितले की, पोलिसांनी आतापर्यंत केवळ आश्वासनच दिलं आहे. मात्र कुठलंही सक्त पाऊल उचललेलं नाही. या घटनेवरून गावात संतापाचं वातावरण आहे. तसेच ग्रामस्थांकडून न्यायाची मागणी केली जात आहे. तसेच पोलिसांवर हलगर्जीपणाचा आरोप केला जात आहे.