जिम ट्रेनरने जिममध्ये येणाऱ्या एका महिलेची हत्या करून तिचा मृतदेह ‘दृश्यम’ स्टाईलने थेट डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटच्या निवासस्थानाच्या परिसरात लपवल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. मृत महिला ही कानपूरमधील एका प्रसिद्ध उद्योगपतीची पत्नी असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, सदर महिलेचा मृतदेह हा डीएमचं निवासस्थान असलेल्या परिसरात नाही तर बाजूच्या क्लबमध्ये मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच शहरातील सर्व जिम आणि जिम ट्रेनरचं पोलिस व्हेरिफिकेशन करण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.
या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार कानपूरमधील व्यावसायिक राहुल गुप्ता यांची पत्नी एकता ही रोज सकाळी ग्रीन पार्क परिसरातील जिममध्ये जायची २४ जून रोजीही ती सकाळी साडे पाचच्या सुमारासा जीममध्ये जाण्यासाठी निघाली. मात्र ती घरी परतलीच नाही. त्यानंतर पती राहुल गुप्ता यांनी जिम ट्रेनरविरोधात पोलिसांकडे एफआयआर दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांकडून तिचा शोध सुरू होता. तसेच जिम ट्रेनर विमल सोनी याच्याही मागावर पोलीस होते. अखेरीत त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवल्यावर विमल याने एकता गुप्ता या महिलेची हत्या केल्याचे कबूल केले.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, आरोपी विमल सोनी आणि मृत एकता गुप्ता यांच्यामध्ये वर्षभरापासून अनैतिक संबंध प्रस्थापित झाले होते. तसेच आरोपीचं अन्यत्र लग्न ठरल्यावर एकताने त्याच्याबरोबर वाद घातला. हा वाद एवढा वाढला की, त्या दरम्यान, आरोपीने एकता हिच्यावर एक ठोसा लगावला. त्यातच या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने तिचा मृतदेह डीएमच्या निवासस्थानाजवळच्या परिसरात पुरला. मात्र मृत महिलेच्या पतीने त्याच्या पत्नीचे कुणासोबतही कुठलेही संबंध नव्हते, असं सांगत पोलिसांचा दावा फेटाळून लावला आहे.
दरम्यान, हत्या केल्यानंतर मृतदेह लपवण्याची कल्पना आरोपी विमल याला दृश्यम चित्रपटामधून सूचल्याचे पोलिसांनी सांगितले. महिलेची हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याचा विचार तो करत होता. तेव्हा त्याला सिंघम चित्रपटात अजय देवगन पोलीस ठाण्यामध्ये मृतदेह कसा लपवतो ते आढवले. त्यानंतर आरोपीचं येणं जाणं असलेल्यी डीएम निवासस्थाना जवळच्या कंपाऊंडमध्ये त्याने या महिलेचा मृतदेह पुरला. दरम्यान, पोलिसांनी विमल याला पकडल्यानंतर सुरुवातीला त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. गुन्हा कबूल केल्यानंतरही त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी निवडलेल्या ठिकाणाबाबत चुकीची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवल्यावर मात्र त्याने मृतदेहाबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी सदर मृतदेह ताब्यात घेतला.