मुझफ्फरनगर - उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर जिल्ह्यात होत असलेल्या गाईंच्या मृत्यूंमुळे खळबळ उडाली आहे. जिह्ल्यात गेल्या दोन दिवसांत 100 हून अधिक गाईंचा मृत्यू झाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. एकापाठोपाठ गाईंच्या होत असलेल्या मृत्यूचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. त्यामुळे प्रशासनाने या प्रकाराच्या तपासाचे आदेश दिले आहेत.मुझफ्फरनगरमधीस काही गावांमध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये 100 हून अधिक गाईंचा मृत्यू झाला आहे. या प्रकाराची दखल प्रशासनाने घेतली असून, तपासाचे आदेश देण्यात आले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ''या गाईंचा मृत्यू हा कुरणांमध्ये झाला आहे. त्यामुळे या गाईंनी विषारी गवत खाल्ले असावे किंवा प्रदूशित पाणी पिल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता एसडीएम विजय कुमार यांनी व्यक्त केली आहे. ''या प्रकाराचा तपास करण्यासाठी वित्त विभागाचे एक पथक बनवण्यात आले आहे. या पथकामध्ये गुरांच्या डॉक्टरांचाही समावेश करण्यात आला आहे. आता हे पथक गाईंच्या मृत्यूमुळे प्रभावित झालेल्या गावांचा दौरा करून एवढ्या मोठ्या प्रमाणावर गाईंचा मृत्यू होण्यामागे काय कारण असावे, याचा शोध घेणार आहे,'' असे विजय कुमार यांनी सांगितले. गतवर्षी एका समाजसेवी संस्थेने दिलेल्या अहवालानुसार लखनौमध्ये दरवर्षी 1000 गाईंचा मृत्यू पॉलिथीनच्या सेवनामुळे होते. यापैकी 90 टक्के प्रकरणांमध्ये मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे गाई मृत्युमुखी पडतात. पोटात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक जमा झाल्याने गाईंचे एक एक अवयव निकामी होत जातात.
दोन दिवसांत 100 गाईंचा मृत्यू झाल्याने उत्तर प्रदेशात खळबळ, तपासाचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 12:22 PM