देवरिया : उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात काँग्रेसच्या एका कार्यक्रमात महिला नेत्या आणि कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली. तारा यादव असे या महिला नेत्याचे नाव असून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच, पक्षाच्या तिकिट वाटपासंदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयाला विरोध केल्यामुळे आपल्याला मारहाण केल्याचे तारा यादव यांनी म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवरियामध्ये पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाने मुकुंद भास्कर यांनी उमेदवारी दिली आहे. मात्र, मुकुंद भास्कर यांना उमेदवारी देण्याला तारा यादव यांनी विरोध दर्शवला. त्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केली. मुकुंद भास्कर यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे आणि अशा व्यक्तीला पक्षाने उमेदवारी दिल्यामुळे आम्ही प्रश्न उपस्थित केला होता, असे तारा यादव यांनी सांगितले.
दरम्यान, याप्रकरणी आता काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी काय कारवाई करणार, याची वाट पाहत आहे, असे तारा यादव म्हणाल्या. एकीकडे, आमच्या पक्षाच्या नेत्या हाथरस प्रकरणातील पीडितेला न्याय मिळावा म्हणून लढाई लढत आहे, तर दुसरीकडे पक्षाचे तिकीट एका बलात्कारी व्यक्तीला दिले जात आहे. पक्षाचा हा निर्णय पक्षाच्या प्रतिमेला मलीन करेल, असेही तारा यादव यांनी म्हटले आहे.
दोन कार्यकर्त्यांचे निलंबनदेवरिया जिल्ह्यात काँग्रेसच्या एका कार्यक्रमात तारा यादव यांना मारहाण केल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश काँग्रेसने एक कमिटी स्थापन केली आहे. ही कमिटी तीन दिवसांत आपला अहवाल सादर करण्यार आहे. तर याप्रकरणी दोन कार्यकर्त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.
महिला आयोगानेही घेतली दखलदुसरीकडे, महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे. आम्ही या घटनेची दखल घेतली असून या घटनेदरम्यान २५ लोक एका महिला नेत्याला मारहाण करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. राजकारणातील लोक महिला कार्यकर्त्यांसोबत गुंडांप्रमाणे व्यवहार करत आहेत. अशा लोकांना शिक्षा मिळायला हवी, असे महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी म्हटले आहे.