लखनौ - काल उत्तर प्रदेश सरकारच्या मंत्रिमंडळाचा काल शपथविधी झाला. दरम्यान, आज उत्तर प्रदेशात एक धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या मुलाच्या कारला भीषण अपघात झाला. जालौनमधील आलमपूर बायपासजवळ झालेल्या या अपघातामध्ये उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांचा मुलगा बालंबाल बचावला.
केशव प्रसाद मौर्य यांचा मुलगा योगेश कुमार मौर्य फॉर्च्युनर कारने जात होते. त्याचदरम्यान, त्यांची फॉर्च्युनर कार आणि ट्रॅक्टरमध्ये जोरदार टक्कर झाली. दरम्याव, या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले आहेत.
कालच केशव प्रसाद मौर्य यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. केशव प्रसाद मौर्य यांचा विधानसभा निवडणुकीत सिराथू मतदारसंघातून पराभव झाला होता. समाजवादी पार्टीच्या उमेदवार पल्लवी पटेल यांनी केशव प्रसार मौर्य यांचा पराभव केला होता. मात्र पक्षाने त्यांच्यावर विश्वास कायम ठेवत त्यांना उपमुख्यमंत्रिपद दिले.
संघाची पार्श्वभूमी असलेले केशव प्रसाद मौर्य हे दीर्घकाल विश्व हिंदू परिषदेमध्येही सक्रिय होते. २०१७ मध्ये केशव प्रसाद मौर्य हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असताना भाजपाने उत्तर प्रदेशात मोठा विजय मिळवला होता. त्यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत होते. मात्र त्यावेळी योगी आदित्यनाथ यांनी बाजी मारली होती.