रायबरेली (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशला बाहेरच्या माणसाची गरज नाही. राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी त्याच्याकडे त्याची माणसे आहेत, अशा शब्दांत प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मी उत्तर प्रदेशचा दत्तकपुत्र या केलेल्या विधानावर शुक्रवारी टीका केली.उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून प्रियांका गांधी प्रथमच येथील जाहीर सभेत भाषण केले. लोकांनी समाजवादी पक्ष-काँग्रेस युतीला बळकट करून सत्ता द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. प्रियांका गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही मोदी यांच्यावर टीका केली. मोदी लोकसभा मतदार संघात ‘पोकळ’ आणि ‘खोटी’ आश्वासने देत असल्याचा आरोप त्यांनी केला. मोदी यांनी गुरुवारी हरदोईत प्रचार सभेत बोलताना वाराणसीने मला दत्तक घेतले असून मी तिच्या मुलासारखा आहे. मी तिचा विकास करीन,’ असे म्हटले होते. यावर प्रियांका गांधी म्हणाल्या,‘‘उत्तर प्रदेशला बाहेरचा माणूस दत्तक घ्यायची गरज आहे, असे मला वाटत नाही.’’ ‘‘मोदीजी, बाहेरील व्यक्ती दत्तक घ्यावी अशी राज्याला गरज आहे का? राज्यात कोणी तरूण नाही का? असे दोन तरूण तुमच्यासमोर आहेत ते म्हणजे राहुलजी आणि अखिलेशजी. या दोघांच्याही हृदयात आणि मनात उत्तर प्रदेश आहे.’’ आपल्या छोट्याशा भाषणात गांधी म्हणाल्या की, कोणताही बाहेरचा नेता गरजेचा नाही. राज्यातील प्रत्येक युवक नेता बनू शकतो. येथील प्रत्येक युवक हा उत्तर प्रदेशसाठी काम करील. (वृत्तसंस्था)पक्ष कमकुवत करणाऱ्यांपासून सावध राहाआपण ज्या समाजवादी पार्टीचे (सपा) नेतृत्व करीत आहोत तोच खरा समाजवादी पक्ष असून, जे लोक या पक्षाला कमकुवत करू इच्छितात त्यांच्यापासून सर्वांनी सावध राहावे, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेख यादव यांनी येथे केले. इटावा येथील नुमाईश मैदानावर गुरुवारी निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते. आपले काका शिवपाल यादव यांचा थेट नामोल्लेख टाळून ते म्हणाले की, आम्ही ज्या लोकांवर विश्वास ठेवत होतो, त्याच लोकांनी माझ्यात आणि नेताजींमध्ये (मुलायमसिंह) मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. भांडणे लावून सायकल हिसकावण्याचा प्रयत्न केला. ते मला षडयंत्र रचून पक्षातून बाहेर करू इच्छित होते. मात्र, आम्ही त्यांचे मनसुबे पूर्ण होऊ दिले नाहीत.
उत्तर प्रदेशला बाहेरच्या माणसाची गरज नाही
By admin | Published: February 18, 2017 1:44 AM