हमीरपूर – उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या मैदानात जोरदार रंगत आली आहे. याठिकाणी सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी उमेदवाराला मात देण्यासाठी विविध राजकीय डाव खेळले जात आहे. सध्या उत्तर प्रदेशातील राठ विधानसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाने चंद्रवती वर्मा नावाच्या महिलेला उमेदवारी दिली आहे. ती सध्या सोशल मीडियात बरीच चर्चेत आहे.
समाजवादी पक्षाची उमेदवार चंद्रवती वर्मा यांचे २ व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यात चंद्रवती वर्मा त्यांच्या २ मैत्रिणीसोबत एका सिनेमातील गाण्यावर थिरकताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडीओत स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग कॉस्ट्यूममध्ये नजर येतात. दोन्ही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चंद्रवती वर्मा जिल्ह्यात चर्चेचा विषय बनल्या आहेत. इटौरा गावातील रहिवासी धनीराम वर्मा यांची मुलगी चंद्रवती हैदराबादमध्ये जिम ट्रेनर आहे.
इंटर कॉलेजमध्ये पदवीचं शिक्षण घेऊन त्यांनी क्रिडा क्षेत्रात रस असल्याने फिटनेस ट्रेनर म्हणून करिअर केले. काही काळ एका जिममध्ये काम केल्यानंतर त्यांनी स्वत:ची कंपनी उघडली. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राठ विधानसभा मतदारसंघात सक्रीय सहभाग नोंदवला. समाजवादी पक्षाने सुरुवातीला राठ विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार गयादीन अनुरागी यांना तिकीट दिलं होतं. परंतु २४ तासांच्या आता त्यांचा पत्ता कट करत चंद्रवती वर्मा यांना उमेदवार म्हणून घोषित केले.
प्रेमविवाह केल्यानं झाली होती चर्चा
चंद्रवती वर्मा अनुसूचित जातीमधील आहे. त्यांनी प्रेमविवाह केल्यानं बरीच चर्चा झाली होती. जालौन जिल्ह्यातील गोरन गावातील हेमेंद्र सिंह राजपूत यांच्याशी प्रेमविवाह झाला होता. हायस्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर दोघांमध्ये प्रेमाचं नातं निर्माण झालं. त्यानंतर शिक्षण पूर्ण झाल्यावर हेमेंद्र आणि चंद्रवती यांनी एकत्र हैदराबाद येथे जीम ट्रेनर म्हणून काम केले. २८ डिसेंबर २०२० मध्ये राठीत दोघांनी मोठ्या दिमाखात लग्न केले.
काँग्रेस उमेदवाराचाही फोटो व्हायरल
समाजवादी पक्षाचे उमेदवार चंद्रवती वर्मा यांच्याआधी हस्तिनापूर येथील काँग्रेसचे उमेदवार आणि अभिनेत्री अर्चना गौतम त्यांच्या ग्लॅमरस अंदाजामुळे चर्चेत आल्या. काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी घोषित झाल्यानंतर सोशल मीडियावर अर्चना गौतम यांचे अनेक फोटो व्हायरल झाले. अर्चना गौतम या मिस बिकनी इंडियाही राहिल्या होत्या.