वाराणसी – २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी नावाची लाट देशभर पसरली आणि केंद्रात सत्ता परिवर्तन झालं. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी सत्तेत आले. मोदी यांच्या रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. मात्र आता ७ वर्षानंतर चित्र पालटल्यासारखं दिसत आहे. वाराणसी येथील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करत असताना याठिकाणी अनेक खुर्च्या रिकाम्या असल्याचं पाहायला मिळालं. इतकचं नाही तर मोदी भाषण करतानाही अनेकजण निघून जात होते. मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात बूथ विजय संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यात हा प्रकार घडला.
वाराणसीच्या संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालयाच्या मैदानावर ३ हजार ३६१ बूथ म्हणून २० हजारांहून अधिक भाजपाचे बूथ पदाधिकारी पोहचले होते. ते सगळे पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाट पाहत होते. परंतु मोदी यांचे भाषण सुरु होताच अनेकजण खुर्ची सोडून जाताना दिसले. बूथ विजय संमेलनात भाजपा पदाधिकाऱ्यांना मोदी विधानसभा निवडणुकीसाठी विजयाचं मंत्र देत होते. परंतु हा कार्यक्रम अर्धा तास उशिराने सुरू झाला. त्यामुळे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते वाट पाहून थकले होते. त्यामुळे जेव्हा मोदींचे भाषण सुरू झाले तेव्हा ते अर्धवट सोडून अनेकजण माघारी परतले.
भाषण सोडून जाणाऱ्या लोकांना कारणं विचारली तेव्हा काहींनी मजबुरीनं अनेक बहाणे दिले. बूथ पदाधिकारी सन्नी सिंह म्हणाले की, त्यांना एका मिटींगला जायचे आहे. उशीर होईल म्हणून जातोय. तर बूथ अध्यक्ष हरिवंश सिंह यांनी कार्यक्रमातून जात नाही. मोदींचे भाषण चालता-फिरता ऐकत असल्याचं सांगितले. OBC मोर्चाचे अध्यक्ष सोमनाथ मौर्य भाषणावेळी बाहेर जात असताना दिसल्यावर म्हणाले की, सुरुवातीला कार्यक्रमाला गर्दी होती. १२ वाजल्यापासून लोकांनी काही खायलं-प्यायलं नाही. खुर्च्या खाली झाल्या नाहीत. काहीजण लघुशंकेला बाहेर गेलेत. कार्यक्रम संपत आल्याने बाहेर जात असल्याचं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत भाजपाच्या मंडल अध्यक्ष मोनिका पांडेय यांनीही मोदींचे भाषण सुरू असताना कार्यक्रमातून बाहेर पडल्या. तेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारले असता मुलीची परीक्षा आहे. तिला गेटपर्यंत सोडण्यासाठी जात आहे. कार्यक्रम सोडून जात नाही तर पुन्हा येणार असल्याचं म्हणाल्या. तर मोदींच्या भाषणाचा शेवट आल्याने लोकं बाहेर पडत आहेत. मोदींनी दिलेला विजयाचा कानमंत्र सर्वजण अंमलात आणतील असं सांगत भाजपा बूथ पदाधिकारी राहुल मिश्रा यांनी सारवासारव केली.