सचिन जवळकोटे झाशी : जुन्या रूढी जपण्यात भाजपची नेते मंडळी तशी नेहमीच आसुसलेली; मात्र एक राजकीय परंपरा मोडीत काढण्यासाठी याच ‘योगी-मोदीं’ची टीम सध्या जीवघेणा संघर्ष करतेय. ही परंपरा आहे सत्तांतराची. उत्तर प्रदेशात गेल्या तीन निवडणुकांमध्ये प्रत्येक वेळी नवीन सरकार आलंय. दरवेळी नव्या नेतृत्वासाठी इथल्या मतदारांनी भलतीच रुची दाखवलीय. २००२ ला या ठिकाणी मुलायम सरकार होतं. २००७ मध्ये बसपानं चमत्कार घडवत मायावतींना मुख्यमंत्री पदावर बसवलं.
२०१२ मध्ये ध्यानीमनी नसताना अखिलेशसिंह यादव निवडून आले. अत्यंत कमी वयात म्हणजे ३९ व्या वर्षी ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या पाच वर्षाच्या काळात ‘गुंडांचं माफियाराज’ खूपच वादग्रस्त ठरलं होतं. त्यांच्या सरकारला दोन वर्ष पूर्ण होत असतानाच २०१४ साली केंद्रात मोदी सरकार आलं. भाजपचे सर्वाधिक विक्रमी खासदार याच उत्तर प्रदेशातून निवडून आले. त्यानंतर २०१७ मध्ये भाजपनं समाजवादी पार्टीची सत्ता उलथवून टाकली. गेल्या पाच वर्षात योगी सरकारनं अनेक कामांचा डंका पिटवला. अखिलेशांना सपोर्ट करणाऱ्या साऱ्या गुन्हेगारांना आत टाकलं. काही ठिकाणी एन्काऊंटरही झाले.
प्रचारसभेत यादव परिवारच ठरवून टार्गेटगेल्या दोन वर्षांपासून यादव घराण्यातील दुफळी संपवून अखिलेश सिंहांनी उत्तर प्रदेशात जी आक्रमक भूमिका घेतलीय, त्यामुळे भाजप नेते प्रचंड सतर्क झालेत. त्याचाच परिणाम की काय म्हणून यंदाच्या निवडणुकीत सत्तांतराची परंपरा गाडण्यासाठी प्रत्येक प्रचारसभेत यादव परिवारालाच ठरवून टार्गेट केलं जातंय.