Uttar Pradesh Election 2022: उत्तर प्रदेशात भाजपाची ‘ताकदवान’ खेळी; काँग्रेसला धक्का तर समाजवादी पक्षालाही दणका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 03:40 PM2022-01-25T15:40:35+5:302022-01-25T15:41:31+5:30
स्वामी प्रसाद मौर्य यांच्या जाण्यानं पक्षात ओबीसी नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली तीदेखील भाजपानं भरुन काढली आहे.
लखनौ – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आर.पी. एन सिंह यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपात प्रवेश केला आहे. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा पाठवत आरपीएन सिंह यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे निवडणुकीत पक्षाला मोठी ताकद मिळाली आहे. यूपीए सरकारच्या काळात मंत्री राहिलेले आरपीएन सिंह यांच्या पक्ष प्रवेशामुळे यूपीच्या राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे.
सत्ता कायम राखण्यासाठी भाजपा लढत असताना स्वामी प्रसाद मौर्य यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. त्यामुळे पक्षाला ओबीसी चेहऱ्याची कमतरता भासत होती. आरपीएन सिंह यांच्या येण्यानं भाजपाची ही पोकळी भरुन निघणार आहे. आर. पी. एन सिंह यांच्या भाजपा प्रवेशामुळे पूर्वांचल आणि विशेष म्हणजे कुशीनगरमधील राजकीय गणित बदलणार आहेत. पूर्वांचलमध्ये स्वामी प्रसाद मौर्य यांच्यारुपाने भाजपानं ओबीसी चेहरा गमावला. परंतु आरपीएन सिंह यांच्यामुळे भाजपाची ती कमी भरुन निघणार आहे. कारण आरपीएन सिंह ओबीसी समुदायातून येतात. त्याशिवाय कुशीनगरमध्ये त्यांच्या राजघराण्याचा दबदबा आहे. त्यामुळे कुशीनगर जिल्ह्यात राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे.
पूर्वांचलमध्ये आरपीएन सिंह यांचा दबदबा
आरपीएन सिंह हे मागासवर्गीय सैंथवार कुर्मी जातीतून येतात. पूर्वांचल परिसरात या जातीच्या लोकांची संख्या जास्त आहे. इतकचं नाही तर आरपीएन सिंह हे काँग्रेससाठी पूर्वांचलमधील सर्वात मोठा चेहरा होता. अशावेळी त्यांच्या भाजपा प्रवेशाने पक्षाला पूर्वांचलमध्ये मोठी ताकद मिळेल. त्याचप्रमाणे स्वामी प्रसाद मौर्य यांच्या जाण्यानं पक्षात ओबीसी नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली तीदेखील भरता येईल. RPN Singh यांचा पडरौना विधानसभा मतदारसंघावरही वर्चस्व आहे. १९९६ मध्ये ते पहिल्यांदा या जागेवरुन आमदार म्हणून निवडून आले. २००९ पर्यंत ते आमदार होते. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी स्वामी प्रसाद मौर्य यांना मात दिली होती. त्यानंतर झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत स्वामी प्रसाद मौर्य जिंकून आले. परंतु २०१४, २०१९ मध्ये भाजपाकडून आरपीएन सिंह यांना पराभव सहन करावा लागला होता.
कोण आहेआरपीएन सिंह (RPN Singh)?
कुशीनगरच्या पडरौनाचे राजा म्हणून ओळखले जाणारे रतनजीत प्रताप नरायन सिंह हे जुने काँग्रेसी आहेत. आरपीएन सिंहचे वडील सीपीएन सिंह हे इंदिरा गांधींच्या काळात संरक्षण मंत्री होते. आरपीएन सिंह हे पडरौना मतदारसंघातून तिनदा आमदार राहिलेत. मनमोहन सिंह सरकारच्या काळात ते केंद्रीय पेट्रोलियम मंत्री, रस्ते परिवहन मंत्री आणि गृहराज्यमंत्री होते. ओबीसी समुदायावर त्यांची पकड मजबूत आहे.