शरद गुप्तानवी दिल्ली : रोजीरोटीसाठी उत्तर प्रदेशातील महाराष्ट्रात वास्तव्यास असले, तरी ते तिकडचे मतदारही आहेत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत हिंदू राष्ट्रासाठी भाजपला मतदान करण्यासाठी त्यांना रेल्वेचे मोफत तिकीट दिले जात आहे. जनसंख्या समाधान फाउंडेशन या संस्थेने एक व्हॉट्सॲप नंबर (९२११००१५००) जारी केला आहे. त्यावर इच्छुकांनी नाव, वय, लिंग, पत्ता आणि तेथील ठिकाण याची माहिती पाठविल्यास त्यांना दोन्ही बाजूने (जाणे-येणे) रेल्वे प्रवासासाठी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून मोफत तिकीट मिळेल.
संकल्प करूनही एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या पक्षाला मतदान दिले तर? यावर वशिष्ट यांनी सांगितले की, त्याचा प्रामाणिकपणा आणि सद्सद्विवेक स्पष्ट होतो. आम्ही चांगल्या कामासाठी प्रति व्यक्ती ४०० रुपये खर्च करीत आहोत. बरेचसे पक्ष मतांसाठी दारू, पैसे आणि साड्याही वाटतात. आम्ही फक्त रेल्वेचे तिकीट देतो. तेही पवित्र कामासाठीच. आमची संस्थाच नव्हें, तर भाजपचे समर्थक असलेले अनेक अनिवासी भारतीय आणि संस्था महाराष्ट्र आणि गुजरातमधून उत्तर प्रदेशच्या मतदारांना मतदानासाठी आणण्यासाठी रेल्वे आणि बसची तिकिटे पाठवित आहेत, असेही वशिष्ट म्हणाले.
तिकीट कधी मिळते?
या संस्थेचे कर्ते-धर्ते अजय वशिष्ट यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, प्रत्येक इच्छुक व्यक्तीकडून आम्ही व्हॉट्सॲपवर एका व्हिडिओ मागवतो. त्यात संबंधित व्यक्ती नाव आणि पत्त्यासह ओळख देत भारताला हिंदू राष्ट्र करण्यासाठी योगदान म्हणून भाजपला मतदान करण्याचा संकल्प करते. त्याला एका तासातच त्या ठिकाणचे दोन्ही बाजूने प्रवासाचे (कन्फर्म) तिकीट मिळते. यासाठी मी पदरखर्च करीत नाही. देश-विदेशातील अनेक लोक मला आर्थिक सहकार्य करीत आहेत. आतापर्यंत महाराष्ट्र आणि गुजरातव्यतिरिक्त दिल्ली व पंजाबमधून उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत जाण्यासाठी आम्ही ५० तिकिटे पाठविली आहेत.