सचिन जवळकोटेफिरोझाबाद : उत्तर प्रदेशातील दुसऱ्या टप्प्याचं मतदान सोमवारी होणार आहे. आता सर्व नेत्यांचं लक्ष तिसऱ्या टप्प्याकडे वळालंय. मात्र या ठिकाणी बटाट्याची दारू भलतीच धुमाकूळ घालू लागलीय तर गल्लीबोळातल्या गुंडांची नशा झटक्यात उतरलीय.
यमुना नदीचं खोरं सध्या ‘बटाट्याचा टापू’ म्हणून प्रसिद्ध. फिरोजाबाद, कन्नोज, मैनपुरीपासून कानपूरच्या बिल्लोर-क्षेत्रापर्यंत रस्त्यावरून जाताना जिकडेतिकडे बटाट्याचीच शेती दिसते. जवळपास साडेपाच लाखांहून अधिक शेतकरी आपल्या शेतात बटाटाच पिकवितात. फरुखाबादसारख्या केवळ एका गावातून बारापेक्षाही जास्त किसान रेल्वे बटाटा घेऊन गेल्या वर्षभरात धावल्या आहेत. शेतकरी आता एकजूट करून प्रश्न विचारू लागलेत. सुरेश सिंग चंदेल ‘लोकमत’ला सांगत होते, ‘जोपर्यंत देशात बटाट्याच्या को-प्रॉडक्ट फॅक्टरी सुरू होत नाहीत, तोपर्यंत आम्हाला हमीभाव मिळणारच नाही. त्यासाठी सरकारनं बटाट्यातून अल्कोहोल तयार करण्याच्या उद्योगांना परवानगी द्यावी. सध्या या परिसरात बटाट्यावर अनेक नवनवीन प्रयोग केले जात आहेत. आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून शेतीत उतरलेल्या आनंद शर्मा यांचा तर दावा आहे की, राष्ट्रीय बटाटा संशोधन केंद्रानं विकसित केलेला निळा बटाटा शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती करेल.
कारण मधुमेह आणि कर्करोग यांच्यासाठी अत्यंत प्रभावशाली असलेला हा नवा बटाटा कमी खर्चात जास्त उतारा देतो.’ उत्तर प्रदेशात बटाट्याचा व्होडका तयार होईल का नाही, याची गॅरंटी या क्षणी कोणत्याच राजकीय नेता देऊ शकत नाही. मात्र याच नेत्यांच्या जीवावर गावागावांत धुमाकूळ घालणाऱ्या गुंडांची नशा उत्तर प्रदेश पोलिसांनी पूर्णपणे उतरून टाकलीय. यंदाच्या प्रचार धुमाळीत निवडणूक आयोगानं अत्यंत कडक भूमिका घेतल्याचं सर्वांनाच जाणवू लागलंय. गल्लीबोळातले एकेक गुंड वेचून-वेचून पोलिसांनी गजाआड केलेत.
थंडीचा कडाका, दारूचा शिडकावा!
उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण तापत असलं असलं तरी थंडीचा कडाका मात्र वाढत चाललाय. या थंडीपासून शेतातील बटाट्याचं सरंक्षण करण्यासाठी शेतकरी चक्क देशी दारूचा वापर करताहेत. पाण्यात दारूच्या बाटल्या ओतून त्याची फवारणी पिकावर केली जात आहे. यामुळे पिकांना म्हणे गर्मी मिळते. विशेष म्हणजे आचारसंहिता काळात अडचण नको म्हणून अनेकांनी अगोदरच बाटल्यांची खोकी घरात भरून ठेवलीत.