सचिन जवळकोटे चित्रकोट : गेल्या निवडणुकीत एकत्र लढणारी काँग्रेस अन् समाजवादी पार्टी यंदा स्वतंत्र. त्यात मायावतींचा पक्षही तयारीत. त्यामुळे चार प्रमुख पक्षांच्या संघर्षात आयाराम-गयारामांना अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध झालेत. सर्वाधिक बंडखोरी झालीय समाजवादी पार्टीत. पिता मुलायम सिंहांची जुनी फळी मोडून काढून अखिलेशांनी स्वतःची टीम तयार केलीय. त्यात पुन्हा निवडून येण्याची खात्री अन् क्षमता असणाऱ्यांनाच तिकीटं. त्यामुळे अवध अन् बुंदेलखंड पट्टा सर्वाधिक नाराज, कारण इथं इच्छुकांची संख्या अधिक. पर्यायानं बंडखोरीचा उद्रेकही याच पक्षात.
उमेदवारांच्या अंतिम यादीत नाव जाहीर झाल्यानंतर मोठ्या उत्साहात अनेकजण मिरवणुकीनं अर्ज भरायला निघाले, मात्र शेवटच्या क्षणी सपानं तिकीट दुसऱ्यालाच देऊन टाकलं. सपातली सर्वाधिक अस्वस्थ नेतेमंडळी शेवटच्या क्षणी बसपात. ‘सायकल’ मिळाली नाही तरीही ‘हत्ती’वर बसण्याचा मान अनेकांनी पटकावलाय. विशेष म्हणजे काही ठिकाणी भाजपनंही याचा पुरेपूर फायदा उचलत सपाच्या बंडखोरांनाच तिकीट देऊन टाकलंय. उत्तर प्रदेशात प्रमुख राजकीय पक्षांच्या चिन्हांना खूप महत्त्व असतं. अखिलेश यांच्या वहिनी अपर्णा यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश करून मुलायमसिंह यांच्या घराण्याला मोठा धक्का दिलाय.