गजानन चोपडे
रामपूर खास : उत्तर प्रदेशातील प्रतापगढ म्हणजे बाहुबली राजाभय्याच्या प्रभावाखाली असलेला जिल्हा. त्यातील रामपूर खास हा मतदारसंघ म्हणजे गेल्या ४२ वर्षांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला. प्रमोद तिवारी यांनी अनेक वर्षे या मतदाराचे प्रतिनिधित्व केल्यानंतर आता कन्येला उत्तराधिकारी नेमले. येथून काँग्रेसचा निर्विवाद विजय होत असला तरी गेल्या निवडणुकीत मताधिक्य घसरल्याने यंदा भाजपने रामपूर खासला टार्गेट केले आहे. हिंदुत्व कुचकामी ठरत असल्याने भाजप रोजगाराच्या मुद्द्यावर रिंगणात आहे. उत्तर प्रदेशात आधीच काँग्रेसचे संघटन कमजोर होत असताना रामपूर खास ही प्रतिष्ठेची जागा वाचविणे पक्षापुढे खरे आव्हान आहे, अवघ्या काही मतांनी पराभूत झालेले भाजप उमेदवार यंदा जंग जंग पछाडत आहेत. जातीय समीकरणात न अडकणारा हा मतदारसंघ कायम काँग्रेससोबत असल्याने भाजपला ही जागा वाटते तेवढी सोपी नसल्याचे बोलले जाते.
पाशा पटेल यांचे ठाणभाजप नेते पाशा पटेल यांना केंद्रीय नेतृत्वाने रामपूर खास आणि बाबागंज या दोन मतदारसंघांची जबाबदारी सोपविली असून, काँग्रेसला पराभूत करण्यासाठी रणनीती आखली जात आहे. महाराष्ट्रातून १० ते १५ नेत्यांची टीम उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये मोर्चा सांभाळत असल्याचे पाशा पटेल यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. रामपूर खासमध्ये कमळ फुलल्यास बांबूपासून इथेनॉल तयार करणारा एक हजार कोटींचा प्रकल्प या क्षेत्रात उभारण्याचे आश्वासन पाशा पटेल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वतीने दिले असल्याचे गोविंद दुबे म्हणाले.
जुनेच प्रतिस्पर्धी मैदानातकाँग्रेसच्या आराधना मिश्रा मोना या विद्यमान आमदार असून, भाजपचे नागेश प्रताप सिंह ऊर्फ छोटे सरकार यांच्यात काट्याची टक्कर आहे. आजवर ५० हजार ते ३१ हजारांचे मताधिक्य काँग्रेसला मिळायचे. मात्र गेल्या निवडणुकीत आराधना १७ हजारच्या मताधिक्याने विजयी झाल्याने भाजपचे मनोबल वाढले आहे.
डबल इंजिन गौण या मतदारसंघात मोदी व योगी यांच्या डबल इंजिन सरकारच्या हिंदुत्वाचा मुद्दा येथे गौण आहे. मुस्लीम मते २० हजारांच्या घरात असून, ब्राह्मण, दलित, कुर्मी, यादव, ठाकूर यांच्या मतांची संख्या फार मोठी आहे.