गाझियाबाद – उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोमाने तयारीला लागलेत. भारतीय जनता पार्टी यूपीत सत्ता राखण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर समाजवादी पक्ष भाजपाच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी सज्ज आहेत. यूपीच्या निवडणूक रिंगणात समाजवादी पक्ष मतदारांना आकर्षिक करण्यासाठी विविध घोषणा देत आहे. त्यातच अखिलेश यादव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाऊलावर पाऊल ठेवलं आहे.
गाझियाबाद येथे झालेल्या पत्रकार परिषदेत अखिलेश यादव म्हणाले की, उत्तर प्रदेशात सरकार आल्यानंतर १० रुपयात समाजवादी थाळी देणार आहोत. या थाळीत पौष्टीक आहार असतील. त्याचसोबत यूपीत ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देणार असल्याचंही ते म्हणाले. समाजवादी पेंशन योजनाही राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरु करण्यात येईल असं आश्वासन अखिलेश यादव यांनी दिलं आहे.
महाराष्ट्रात शिवभोजन थाळीचा शुभारंभ
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी राज्यातील गरिब जनतेला १० रुपयात शिवभोजन थाळी देऊ असं आश्वासन दिलं होतं. सुरुवातीला उद्धव ठाकरे यांच्या आश्वासनाची विरोधकांनी खिल्ली उडवली होती. परंतु राज्यात झालेल्या सत्ताबदलानंतर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे विराजमान झाले. जाहिरनाम्यात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात शिवभोजन थाळी सुरु केली.
कोरोना महामारी काळात राज्य सरकारने शिवभोजन थाळी मोफत देण्यास सुरुवात केली. त्यामुळे हजारो कुटुंबीयांची भूक भागली. आतापर्यंत ५ कोटींहून अधिक लोकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला आहे. गरीब आणि गरजू व्यक्तींना स्वस्तात भोजन मिळावं यासाठी शिवभोजन थाळी योजना महाराष्ट्रात सुरु करण्यात आली होती. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयात, जिल्हा रुग्णालय, बस स्थानकं, रेल्वे परिसर यासाठी शिवभोजन थाळी देण्यात येते.
१० रुपये शिवभोजनात काय मिळतं?
राज्य सरकारने सुरु केलेल्या शिवभोजन योजनेत ३० ग्रॅम चपात्या, १०० ग्रॅमची एक वाटी भाजी, १५० ग्रॅमचा एक मूद भात, १०० ग्रॅमचे एक वाटी वरण समाविष्ट असलेली ही थाळी दुपारी १२ ते २ या वेळेत दिली जाते.