लखनऊ – उत्तर प्रदेश निवडणुकीच्या मैदानात सर्वच पक्षांनी जय्यत तयारी सुरु आहे. यूपीत भाजपा आणि समाजवादी पक्षात थेट लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. योगी आदित्यनाथ यांना सत्तेवरुन हटवण्यासाठी समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी सुरुवातीपासून रणनीती आखली आहे. भाजपाचे मंत्री, आमदार यांनी पक्षाला रामराम करत समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. सध्या सपामध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये एका नेत्याची जोरदार चर्चा सुरु आहे. या नेत्याच्या पक्षप्रवेशाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
देशातील सर्वात उंच व्यक्ती धर्मेंद्र प्रताप सिंह(Dharmendra Pratap Singh) यांनी अलीकडेच समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत त्यांनी सपाचं सदस्यत्व घेतले आहे. ४६ वर्षीय धर्मेंद्र प्रताप सिंह यांची उंची ८ फूट २ इंच इतकी आहे. धर्मेंद्र प्रताप सिंह नरहरपूरच्या कसियाही गावात राहणारे आहेत. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांची नोंद आहे. आशिया खंडातील सर्वात उंच असलेल्या पुरुषांमध्येही धर्मेंद्र प्रताप सिंह यांचं नाव येते.
धर्मेंद्र प्रताप सिंह यांच्याबद्दल आणखी काही...
धर्मेंद प्रताप सिंह यांच्याकडे मास्टर डिग्री आहे. परंतु ४६ वर्ष असतानाही अद्याप त्यांच्याकडे कायमस्वरुपी नोकरी नाही. धर्मेद्र यांचे लग्नही झालं नाही. धर्मेंद्र यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी सांगितले की, उंची जास्त असल्याने कमरेखालच्या भागात सातत्याने वेदना होत असतात. रोजचा दिनक्रम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
लखनऊच्या एका डॉक्टरनं धर्मेंद्र प्रताप सिंह यांना ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला होता. परंतु पैशांची कमतरता असल्याने ते उपचार करु शकले नाहीत. २०१९ मध्ये उपचारासाठी मदत मिळावी म्हणून धर्मेंद्र प्रताप सिंह यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मदत मागितली होती. जेव्हा ते योगींच्या घरी गेले होते तेव्हा ते घरात नव्हतं. परंतु मुख्यमंत्री कार्यालयात भेट घेतली तेव्हा त्यांनी मदतीचं आश्वासन दिलं आणि २०१९ मध्ये हिप रिप्लेसमेंटसाठी सर्जरी करुन दिली.
मिरर यूकेच्या वृत्तानुसार, उंची जास्त असल्याने अद्याप त्यांचे लग्न झालं नाही. माझ्या इतक्या उंचीची मुलगी शोधणं खूप कठीण आहे. हे अशक्य असल्याचं धर्मेंद्र म्हणतात. धर्मेंद्र यांच्या कुटुंबातील बहुतांश लोकांची उंची सर्वसामान्य आहे. त्यांचे आजोबा ७ फूट ३ इंच होते. लहानपणापासून धर्मेंद्रला जिराफ नावानं चिडवलं जातं. मागील आठवड्यात धर्मेंद्र प्रताप सिंह यांनी अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत समाजवादी पक्षात प्रवेश केला. आता उत्तर प्रदेश निवडणुकीत ते समाजवादी पक्षाचा प्रचार करणार आहेत. पक्ष मला जी जबाबदारी देईल ती सांभाळायला मी तयार आहे. जर सपानं मला तिकीट दिली तर प्रतापगड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे.