मनोज मुळ्येमुरादाबाद (उत्तर प्रदेश) : पितळी शहर म्हणून ओळख असलेल्या आणि पितळीवरील नक्षीकाम तसेच विविध प्रकारच्या चषकांसाठी (ट्रॉफीज) प्रसिद्ध असलेल्या मोरादाबाद जिल्ह्यात सत्तेसाठी जोरदार झुंज सुरू आहे. या जिल्ह्यात असलेल्या समाजवादी पार्टीच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. भाजप, सपा, एमआयएमसोबतच काँग्रेसनेही मोरादाबादसह लगतच्या जिल्ह्यात प्रचारावर भर दिला आहे.
मुरादाबाद जिल्ह्यात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी ४ मतदारसंघांत समाजवादी पार्टीचे आमदार आहेत. एक मतदारसंघ भाजपकडे तर एक मतदारसंघ पीस पार्टीकडे आहे. १४ फेब्रुवारी कोडी या जिल्ह्यात मतदान होत आहे. आता प्रचाराला दोनच दिवस हातात असल्याने सर्व राजकीय पक्षांनी या मतदारसंघात जोर लावला आहे. या भागात मिळत असलेले अपयश भरून काढण्यासाठी आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विशेष लक्ष दिले आहे.
‘ये नगरी पित्तल दी’ मुरादाबादची मुख्य ओळख ही येथील पितळीवरील कलाकुसरीमुळे आहे. दरवर्षी हजारो कोटी रुपयांची उलाढाल पितळीवरील कलाकुसरीच्या वस्तूंच्या विक्रीतून होत आहे. २०१८मध्ये ही उलाढाल ९ हजार कोटी रुपये इतकी होती. त्यातील केवळ परदेशी निर्यातीतूनच ५४०० कोटींची उलाढाल झाली हाेती. म्हणूनच मोरादाबादला पितळी शहर म्हणूनही ओळखले जाते.
अखिलेश यादव, जयंत चौधरी आज रामपूरमध्ये
भाजपने या मतदारसंघात प्रचाराचा धडाका लावल्याने सपानेही त्याची दखल घेतली आहे. आता प्रचाराच्या शेवटच्या दिवशी १२ रोजी सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव तसेच त्यांच्याशी आघाडी असलेले राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष जयंत चाैधरी रामपूरमध्ये येत आहेत. प्रचार आणि एकूण वातावरणनिर्मितीत या जिल्ह्यात काँग्रेस खूप मागे असली तरी काँग्रेसच्या महासचिव आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियांका गांधी यांनी गुरुवारी मोरादाबादमध्ये जनसंपर्क रॅली काढली.