शरद गुप्ता
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये गुरुवारी झालेल्या पहिल्या टप्प्यातील मतदानाने हे स्पष्ट संकेत दिले की, भाजपकडून चांगली कामगिरी होत नाही. यासाठी समाजवादी पार्टी- राष्ट्रीय लोकदल (सपा-रालोद) युतीची भूमिका कमी स्वत: भाजपमधील अंतर्गत राजकारण जास्त जबाबदार आहे.
भाजप नेत्यांचे जास्त लक्ष सपा-रालोद युतीला पराभूत करण्याऐवजी पक्षातील आपल्या अंतर्गत शत्रूंना पराभूत करण्याकडे आहे. म्हणून गोरखपूरमध्ये ना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मार्ग सोपा आहे ना कौशांबीच्या सिराथू मतदारसंघात उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांचा. भाजपमधील एक गट मौर्य यांच्याविरोधात उभ्या असलेल्या सपा युतीच्या पल्लवी पटेल यांना रसद पुरवत आहे तर दुसरा गट गोरखपूरमध्ये आदित्यनाथ यांच्याविरोधात काम करीत आहे.
मतभेद आणि समन्वयाची टंचाई फक्त राज्यस्तरीय नेत्यांमध्येच आहे असे नाही तर केंद्रीय नेत्यांमध्येही ती आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे समर्थकही एक दुसऱ्याच्या विरोधात काम करताना दिसतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या टप्प्यात एकाही सभेत भाषण न करण्याचा घेतलेला निर्णयही याच घटनांशी जोडून बघितला जात आहे. खराब हवामानाला दोष देत ते बिजनोरला गेले नाहीत तर, योगी आदित्यनााथ यांचे हेलिकॉप्टर त्याच हवामानात बिजनोरमध्ये उतरले व त्यांनी सभेत भाषणही केले.
१९९९ मधील वातावरणभाजपच्या वरिष्ठ नेत्याने या परिस्थितीचे वर्णन १९९९ मधील लोकसभा निवडणुकीसारखे वातावरण आहे, अशा शब्दांत केले. तेव्हा राज्यात भाजपमध्ये कल्याण सिंह, राजनाथ सिंह, कलराज मिश्रा, लालजी टंडन यांच्यासह अनेक गट एकमेकांविरोधात काम करीत होते. त्यामुळे १९९८ मध्ये भाजपने राज्यात ५८ जागा जिंकल्या होत्या त्या १९९९ मध्ये २९ वर आल्या.