यावेळी उत्तर प्रदेशच्या जनतेने पुढील पाच वर्षांसाठी कुणाच्या हाती सत्ता सोपवली? या प्रश्नाचे नेमके उत्तर 10 मार्चला होणाऱ्या मतमोजणीनंतरच मिळेल. मात्र, सध्या जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्ष (भाजप) पूर्ण बहुमताने आपले सरकार स्थापन करेल, असा दावा करण्यात आला आहे. या एक्झिट पोलचे आकडे, प्रत्यक्ष निकालात रुपांतर झाले, तर पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होतील. याच वेळी योगी आदित्यनाथ यांच्या नावावर किमान 3 विक्रमांचीही नोंद होईल.
योगी आदित्यनाथ हे 15 वर्षांत पहिले MLA असलेले मुख्यमंत्री होतील? -एक्झिट पोलचे आकडे खरे ठरले आणि उत्तर प्रदेशात भाजपने सत्ता जिंकली तर, योगी आदित्यनाथ हे 15 वर्षांनंतर यूपीचे विधानसभा सदस्य असलेले मुख्यमंत्री होतील. 2017-22 च्या कार्यकाळात ते विधान परिषदेचे सदस्य होते. अखिलेश यादवही विधान परिषदेचे सदस्य म्हणूनच मुख्यमंत्री झाले होते.
37 वर्षोंनंतरचे सत्ता कायम ठेवणारे पहिले मुख्यमंत्री -भाजपला बहुमत मिळाल्यास योगी आदित्यनाथ हे तब्बल 37 वर्षांनंतर सलग दुसऱ्यांदा शपथ घेणारे मुख्यमंत्री असतील. राज्यात 1985 मध्ये जेव्हा निवडणुका झाल्या, तेव्हा काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी हे अखंड उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. या निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला आणि ते सलग दुसऱ्यांदा या पदावर राहिले. त्यानंतर मात्र कुणालाही सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची खुर्ची राखता आलेली नाही. योगी आदित्यनाथ यांना विक्रम करण्याची संधी आहे. एनडी तिवारींपूर्वी, तीन जणांना सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची खुर्ची राखता आलेली आहे. 1957 मध्ये संपूर्णानंद, 1962 मध्ये चंद्रभानू गुप्ता आणि 1974 मध्ये हेमवती नंदन बहुगुणा हे होते. त्यामुळे आता भाजपचा विजय झाल्यास, योगी आदित्यनाथ हे अशी कामगिरी करणारे यूपीच्या इतिहासात पाचवे मुख्यमंत्री बनू शकतात.
पुन्हा सत्ता मिळवणारे पहिले भाजप सीएम -उत्तर प्रदेशने आतापर्यंत भाजपचे चार मुख्यमंत्री पाहिले आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या आधी कल्याण सिंह, रामप्रकाश गुप्ता आणि विद्यमान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. मात्र, आदित्यनाथ यांच्या आधी भाजपचा एकही मुख्यमंत्री सलग दुसऱ्यांदा सत्ता राखू शकला नाही. योगी आदित्यनाथ यांना हा नवा विक्रम करण्याची संधी आहे.