उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथून दिल्लीला जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनला शनिवारी सकाळी मेरठमधील दौराला स्टेशनवर भीषण आग लागली. ट्रेनचा ब्रेक जाम झाल्याने ही घटना घडल्याचे बोलले जाते. या अपघातात रेल्वेच्या इंजिनसह दोन डबे जळून खाक झाल्याचे समजते.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन दौराला स्टेशनवर पोहोचली तेव्हा तिच्या इंजिनच्या खालच्या बाजूला आग लागली. यानंतर, ट्रेनमधील प्रवाशांना धूर आणि ठिणग्या निघताना दिसल्या आणि ते आरडा-ओरड करत ट्रेनमधून बाहेर पडत प्लॅटफॉर्मवर धावले. यानंतर त्यांनी ट्रेनमधील इतर प्रवाशांना आणि चालकालाही सावध केले. ट्रेनला आग लागल्याची माहिती मिळताच प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती. तसेच यावेळी अनेक लोकांनी मागच्या डब्यात बसलेल्या प्रवाशांनाही घटनेची माहिती देत सावध केले.यानंतर, बघता-बघता ट्रेनमध्ये लागलेल्या आगीने भीषण रूप धारण केले. आग डब्ब्यांमध्येही पसरली. रेल्वे प्रशासनाने अग्निशमन दलाला पाचारण केले. मात्र, अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचेपर्यंत इंजिनसह दोन्ही डब्यांत ही आग पूर्णपणे पसरली होती. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाने आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. पण ही आग एवढी भीषण होती, की काही वेळातच दोन्ही डबे जळून खाक झाले. दरम्यान, काही प्रवाशांच्या मदतीने ट्रेनचे हे डबे इतर डब्यांपासून वेगळे करण्यात आले.देवबंदपासूनच येत होता आवाज -ट्रेनमधून उतरत स्वतःचा जीव वाचवलेल्या प्रवाशांनी सांगितल्यानुसार, त्यांना देवबंदपासूनच काही आवाज आणि वासही येत होते. मात्र, याचे कारण कुणालाही समजत नव्हते. नंतर, अचानकपणे सीटखालून धूर निघू लागला. धूर अधिक वाढल्यानंतर, प्रवाशांची धावपळ उडाली आणि दौराला स्टेशनवर गाडी थांबताच प्रवासी आरडा-ओरड करत गाडीतून बाहेर पडले.