राज्यातील तरुणांना 100 दिवसांत दहा हजार नोकऱ्या देण्यात येतील, अशी घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी केली. राज्यातील सर्व निवड आयोग आणि मंडळांच्या अध्यक्षांसोबत आपल्या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले आहेत. महत्वाचे म्हणजे, एका सत्राशी संबंधित सर्व भरती परीक्षा त्याच सत्रात पूर्ण कराव्यात, असेही योगी यांनी म्हटले आहे.
तरुणांना सरकारी नोकऱ्यांशी जोडून, त्यांना रोजगार देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सरकारने गेल्या पाच वर्षांत 4.5 लाख सरकारी नोकऱ्या दिल्या आहेत. राज्य सरकारने पूर्वीप्रमाणेच, आपल्या दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीपासूनच तरुणांना सरकारी नोकरी देण्यासाठी, सर्व निवड आयोग आणि बोर्डांना 100 दिवस, सहा माहिने आणि वार्षिक लक्ष्य निर्धारित करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, त्यांनी सर्व विभागांना वेळच्या-वेळीच मागण्या पाठविण्याचेही निर्देश दिले आहेत.
भर्ती प्रक्रियेत आरक्षणाच्या नियमांचे पालन व्हावे -भरती प्रक्रियेत आरक्षणाचे नियम पूर्णपणे पाळले जावेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. भरतीच्या जाहिरातीत आरक्षणाचे नियम नमूद करावेत. भरती प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी परीक्षा एजन्सी निवडताना आणि परीक्षा केंद्रांची निवड करताना विशेष काळजी घ्यावी. परीक्षा केंद्रे निश्चित करताना सरकारी शाळांना प्राधान्य द्यावे. परीक्षा केंद्र निवडताना जिल्हा प्रशासनाने काळजी घ्यावी.
परीक्षा केंद्र ठरवताना उमेदवारांची सोय लक्षात घेतली जावी. उमेदवारांची पडताळणी निर्धारित वेळेत पूर्ण करावी. तसेच, पालीवाल समितीच्या शिफारशींनुसार भरती प्रक्रिया करण्यात यावी, असे निर्देशही योगी आदित्यनाथ यांनी यावेळी दिले.