ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 4 - बलात्काराचा आरोप असलेला उत्तरप्रदेश सरकारमधील मंत्री गायत्री प्रजापती आणि अन्य सहा जणांविरोधात उत्तरप्रदेश पोलिसांनी नॉन बेलेबल वॉरंट जारी केले आहे. प्रजापतीने देशबाहेर पळ काढू नये यासाठी त्याचा पासपोर्ट महिन्याभरासाठी रद्द करण्यात आला आहे.
नेपाळला लागून असलेल्या उत्तरप्रदेशच्या सीमेवर तैनात असलेले सशस्त्र सीमा बल आणि इमिग्रेशन यंत्रणांना सर्तक करण्यात आले आहे. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसकडून गायत्री प्रजापती मंत्राचा जप सुरु असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्यानंतर पोलिसांनी कारवाईचे पाऊल उचलले.
गायत्री प्रजापती आणि अन्य सहाजणांवर महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा आणि तिच्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. आपल्या देशात चांगले काम करताना गायत्री मंत्राचा जप केला जातो पण सपा आणि काँग्रेस गायत्री प्रजापती मंत्राचा जप करत आहेत. त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवला गेल्यानंतरही मुख्यमंत्री त्याच्या प्रचारासाठी गेले. तेव्हा प्रजापती तिथे होता पण आता तो सापडत नाही अशी टीका जौनपूर येथील सभेत बोलताना मोदींनी केली.