ऑनलाइन लोकमत
गाझियाबाद, दि. 8 - समाजवादी पक्षाच्या कार्यकाळात उत्तर प्रदेशमध्ये गुंडाराज आणि भ्रष्टाचार माजल्याची घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. गाझियाबाद येथे झालेल्या जाहीर सभेला संबोधित करताना मोदींनी भ्रष्टाचार आणि राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून अखिलेश यांना घेरण्याचा प्रयत्न केला.
मोदी म्हणाले, उत्तर प्रदेशात मुली शाळेत जायला घाबरतात. समाजवादी पक्षाने गुंड पाळले आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशची कायदा सुव्यवस्था बिघडवली आहे. अखिलेशजी तुमचे वडील, काका आणि बाकीच्या नातेवाईकांनी काय केले आहे, ते जनतेला माहीत आहे. अखिलेशजी मुख्यमंत्रीपदी आले तेव्हा हा युवा नेता राज्याचा विकास करेल असे वाटले होते, पण यांनी तर उत्तर प्रदेशची परिस्थिती अधिकच बिघडवली.
यावेळी मोदींनी भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून अखिलेश यादव आणि सपावर चौफेर टीका केली, " भ्रष्टाचाराने देशाला बर्बाद केले आहे. भ्रष्टाचार रोखला गेला पाहिजे. पण उत्तर प्रदेशात तर भ्रष्टाचार फोफावला आहे. राज्यातील सरकारी नोकऱ्यांची प्रक्रिया भ्रष्टाचाराचे कुरण बनली आहे. सरकारी नोकऱ्यांसाठीच्या मुलाखतीची प्रक्रिया बंद झाली तर सरकारी नोकऱ्यांच्या वाटपातील भ्रष्टाचार बंद होईल," असेही ते म्हणाले. "सध्या सत्ता जाण्याची भीती अखिलेश यांना सतावत आहे, त्यामुळे जो मिळेल त्याची ते गळाभेट घेत आहेत. नाहीतर त्यांनी काँग्रेसशी आघाडी केली नसती," असा टोलाही मोदींनी लगावला.
उत्तर प्रदेशमधील गेल्या 14 वर्षांपासूनचा विकासाचा वनवास संपवून, विकास आणण्याची ही निवडणूक आहे. योग्य सरकार निवडले तर उत्तर प्रदेश देशातील उत्तम प्रदेश बनू शकतो. त्याबरोबरच आपण केलेल्या कामाचा 2019 साली समोर येऊन हिशोब देऊ, असेही मोदींनी भाषणादरम्यान सांगितले.