ज्ञानवापी मशिदीतील सर्व्हेनंतर, तेथील वझूखान्यात शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. यानंतर देशातील राजकारण तापताना दिसत आहे. एवढेच नाही, तर या प्रकरणातील दोन्ही पक्ष एकमेकांना खोटे ठरविण्याचा प्रयत्नही करत आहेत. यातच आता, ज्ञानवापी मशिदीचा एक कथित व्हिडिओही समोर आला आहे.
या जुन्या व्हिडीओमध्ये एक दगड दिसत आहे. यासंदर्भात ते शिवलिंग असल्याचा दावा हिंदू पक्षाने केला आहे. तर मुस्लीम पक्ष तो कारंजा असल्याचे म्हणत आहे. मात्र, यासंदर्भातील सत्य काय, हे न्यायालयाच्या निर्णयानंतरच सर्वांसमोर येईल. लोकमत या व्हायरल व्हिडिओची पुष्टी करत नाही.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. यात काही लोक वझुखान्याची स्वच्छता करताना दिसत आहेत. येथे काही लोक झाडू मारताना दिसत आहेत, तर काही पायपाने पाणी मारताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्यो तो दगडही स्पष्टपणे दिसत आहे. यावरूनच सध्या वाद सुरू झाला आहे.
ज्ञानवापीमध्ये कारंजा सापडला - ओवेसीमशीद कमिटीने दिलेल्या माहितीनुसार, मशिदीत शिव लिंग नाही, तर कारंजा होता. असे कारंजे प्रत्येक मशिदीत आढळतात, असे असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे.
न्यायालयाचा आदेश 1991 मध्ये तयार झालेल्या कायद्याविरोधात -न्यायालयाने नियुक्त केलेल्या कमिश्नरने शिवलिंग आढळून आल्याचा दावा न्यायालयात केलेला नाही. पण हिंदू पक्षाच्या वकिलाने न्यायालयात जाऊन, शिवलिंग आढळल्याचा दावा केला आहे. यानंतर न्यायालयाने संबंधित स्थळ सील करण्याचा आदेश दिला आहे. हा आदेश 1991 च्या संसदेत तयार झालेल्या कायद्याविरुद्ध आहे. तसेच, जर मशिदीत शिवलिंग आढळून आले, तर ही बाब कमिश्नरने न्यायालयात सांगायला हवी होती, असेही ओवेसी यांनी म्हटले आहे.