हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रात सर्वात जास्त असल्याची चर्चा असली तरी, प्रत्यक्षात उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड रुग्णसंख्येबाबत फार मोठ्या आघाडीवर आहेत.
महाराष्ट्र कदाचित रुग्णसंख्येत राज्यांत पुढे असेल. परंतु, रुग्णवाढीचा मुद्दा येतो तेव्हा उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडने आघाडी घेतली आहे. वस्तुस्थिती अशी की, टक्केवारीचा विचार केला तर महाराष्ट्राने या दोन राज्यांच्या तुलनेत चांगले काम केले आहे. संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार एक एप्रिल रोजी महाराष्ट्रात ४३,१८३ रुग्ण होते ते १७ एप्रिल रोजी ६७,१२३ झाले. १७ दिवसांत महाराष्ट्रात रुग्णांत १५५ टक्के वाढ झाली. परंतु, हीच वाढ उत्तर प्रदेशमध्ये १,०५५ टक्के (महाराष्ट्राच्या सात पट) होती. उत्तर प्रदेशमध्ये एक एप्रिल रोजी २५८९ रुग्ण होते ती संख्या १७ एप्रिल रोजी २७३३४ झाली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे, कुंभमेळ्याने फैलाव केला नाही असा दावा कदाचित करतीलही. परंतु, आकडेवारी या दाव्याला दुजोरा देत नाही. उत्तराखंडमध्ये एक एप्रिल रोजी ५०० रुग्ण होते. परंतु, १७ एप्रिल रोजी ती संख्या २७५७ झाली. म्हणजे १७ दिवसांत ५५१ टक्के वाढ. ही वाढ महाराष्ट्रात झालेल्या १५५ टक्के वाढीच्या किती तरी जास्त आहे. कोरोना रुग्णवाढीची राष्ट्रीय सरासरी ही निराश करणारी आहे. कारण एक एप्रिल रोजी ८१,३९८ रुग्ण होते ते १७ एप्रिलला २,६०,८९५ झाले. ही वाढ ३२० टक्क्यांची आहे.
‘लसीकरण झाले तरीही भारतात प्रवास टाळा’वाॅशिंग्टन/नवी दिल्ली : भारतात काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत दरराेज अडीच लाखांहून नवे रुग्ण आढळत आहेत. काेराेनाच्या उद्रेकामुळे भारतात प्रवास करू नये तसेच ज्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, अशांनीही भारतात जाणे टाळण्याचा सावधगिरीचा इशारा अमेरिकेच्या राेग नियंत्रण व प्रतिबंध केंद्राने अमेरिकन नागरिकांना दिला आहे. भारतात काेराेनाच्या विषाणूचे डबल म्युटेशन आढळून आले आहे. हा विषाणू अतिशय वेगाने पसरताे. त्यामुळे भारतात काेराेनाच्या रुग्णसंख्येचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे अमेरिकन नागरिकांनी भारतात जाणे टाळावे, असा सल्ला दिला आहे. ‘सीडीसी’ने म्हटले आहे, की पूर्ण लसीकरण झाले तरीही संसर्ग तसेच विषाणूचा प्रसार होण्याचा धाेका आहे.