ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. १५ - दोन पत्नी असणा-या व्यक्तीस शाळेत उर्दू शिक्षकाची नोकरी मिळणार नाही असा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने घेतला असून त्यासाठी आदेशही काढला आहे. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने मात्र या निर्णयावर नाराजी दर्शवली असून हा आदेश म्हणजे मुस्लिमांच्या अधिकारांचे उल्लंघन करण्यासारखे आहे, असे म्हटले आहे.
पुढील शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी प्राथमिक शाळामध्ये ३५०० उर्दू शिक्षकांची भरती करण्याची नोटीस राज्य सरकारने जारी केली आहे. या पदसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आपली वैवाहिक स्थिती व त्याबद्दलची माहिती देणे बंधनकारक असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. ज्या उमेदवाराला दोन पत्नी असतील ती व्यक्ती या पदासाठी अपात्र ठरेल तसेच एखाद्या महिला उमेदवाराने या पदासाठी अर्ज केला असेल आणि जर तिच्या पतील दोन बायका असतील, तर त्या महिला उमेदवारालाही नोकरीसाठी अपात्र ठरवण्यात येईल, असे सरकारने नोटीशीत म्हटले आहे. उमेदवार/ कर्मचा-याच्या मृत्यूनंतर त्याचे निवृत्तीवेतन कोणाला मिळावे, याबाबतचा वाद टाळण्यासाठी हा नवा आदेश जारी करण्यात आल्याचे राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.
' मात्र कर्मचारी भरती करताना सरकार असा नियम लागू करू शकत नाही. इस्लाम धर्मात चार विवाह करण्याची मुभा आहे, मात्र केवळ एक टक्के मुस्लिम पुरूषांना दोन पत्नी असतात, असे सांगत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने या निर्णयामुळे मुस्लिमांवर अन्याय होत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच एखाद्या व्यक्तीला दोन पत्नी असतील तर त्याच्या मृत्यूनंतर निवृत्तीवेतनाचा प्रश्न उद्भवू नये म्हणून त्याचे निवृत्तीवेतन दोन्ही पत्नींना विभागून देता येईल, असा युक्तिवादही बोर्डाने केला आहे.