सिद्धार्थनगर -उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यात भैसहिया नावाचे गाव आहे. या गावच्या मतदार यादीत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मोठ्या-मोठ्या दिग्गजांची नावे आहेत. हा प्रकार समोर आल्यानंतर, येथील प्रशासन चक्रावले आहे. नव्हे येथील प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच चौकशी अहवाल आल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
धक्कादायक गोष्ट म्हणजे, राजकीय नेते आणि चित्रपट अभिनेत्रींची नावे बीएलओसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या यादीत आढळून आली आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मतदार यादी 2015मध्येच तयार करण्यात आली आहे. तीच यादी 2020मध्येही पुनरावलोकनासाठी बीएलओंना सादर करण्यात आली आहे. पुनरावलोकनाचे काम सुरू आहे. यातील तृटीही दूर केल्या जात आहेत. नवी यादी 6 डिसेंबरला जारी केली जाईल.
मुलायम, माया आणि सोनम कपूरचेही नाव - डुमरियागंज तहसीलच्या हद्दीत येणाऱ्या भैसहिया गावच्या मतदार यादीत मोठा घोटाळा झल्याचे निदर्शनास आले आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव, मायावती, एमपीचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि चित्रपट अभिनेत्री सोनम कपूर आदींच्या नावाचाही समावेश आहे.
जिल्हा निवडणूक कार्यालयावर प्रश्नचिन्ह -मतदार यादीत झालेला हा घोटाळा लक्षात आल्यानंतर जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या गावात साधारणपणे 1300 मतदार आहेत. असेही अनेक लोक आहेत, ज्यांनी मतदार यादीत नाव यावे यासाठी अनेक वेळा कागदपत्र जमा केली आहेत. मात्र, अद्यापही त्यांची नावे मतदार यादीत आलेली नाहीत.