मेरठ : त्रिपुरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या ऐतिहासिक विजयानंतर अनेक ठिकाणी हिंसा सुरू झाल्याच्या बातम्या येत आहेत. पुतळ्यांची तोडफोड करण्याचे प्रकार वाढत आहेत. आता उत्तर प्रदेशमध्येही पुतळ्यांची तोडफोड करण्याचं लोण पोहोचलं असून मेरठ येथील मवाना येथे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. पण प्रशासनाने या घटनेची तात्काळ दखल घेत डॉ. आंबेडकरांचा पुतळा बसवला.
मंगळवारी रात्री उशीरा काही समाजकंटकांनी मेरठच्या मवाना येथे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केली. सकाळी गावक-यांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी गोंधळ घातला, वाढता वाद पाहून त्या ठिकाणी नव्या मुर्तीची स्थापना करण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवला असून आरोपींचा शोध घेत आहेत.
त्रिपुरामध्ये भाजपानं ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी विजयाच्या उन्मादात लेनिनचा पुतळा जेसीबी लावून उखडला होता. त्यानंतर पुतळ्यांची विटंबना करण्याचं लोणच समाजकंटकांमध्ये पसरत आहे. मंगळवारी तामिळनाडूत पेरियार यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. याशिवाय कोलकाता येथे भाजपाचे नेते श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्याचीही विटंबना करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.