कानपूर : उत्तर प्रदेशातील अत्तर व्यापारी पीयूष जैन (Piyush Jain) याने छापेमारीत जप्त केलेले कोट्यवधी रुपये परत करण्याची मागणी केली आहे. करचुकवेगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या पीयूष जैनने जप्त केलेल्या पैशांसाठी कोर्टात धाव घेतली आहे. त्याने कोर्टाला 52 कोटी रुपयांचा कर आणि दंड कापून उर्वरित रक्कम परत करण्याची मागणी केली आहे.
पीयूष जैन न्यायालयीन कोठडीतकाही दिवसांपूर्वी कानपूरचा अत्तर व्यापारी पीयूष जैनच्या घरी आणि इतर ठिकाणांवर आयकर विभागाने धाड टाकली होती. त्यात सूमारे 200 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. आता त्याने GST इंटेलिजेंस डायरेक्टोरेट जनरल (DGGI) ला कर आणि दंड वजा करुन उर्वरित रोकड परत करण्याची मागणी केली आहे. करचुकवेगिरीच्या आरोपाखाली जैनला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.
उर्वरित रक्कम परत करण्याची मागणीइंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, डीजीजीआयचे विशेष सरकारी वकील म्हणजेच अधिवक्ता अमरीश टंडन यांनी बुधवारी न्यायालयाला माहिती दिली की, पीयूष जैनने कर चुकवल्याची कबुली दिली आहे आणि करचुकवेगिरी आणि दंडासह 52 कोटी रुपये थकित आहेत. तर, पीयूष जैनच्या वकिलाने कोर्टाकडे अपील केली की, कोर्टाने डीजीजीआयला निर्देश देऊन पियुष जैनच्या जप्त केलेल्या पैशातून 52 कोटी रुपये दंड म्हणून कापून उर्वरित रक्कम परत करावेत.
पैसे परत करता येणार नाहीतमात्र, याला उत्तर देताना डीजीजीआयचे वकील अमरीश टंडन म्हणाले की, पियुष जैनच्या घरातून जप्त करण्यात आलेली रक्कम ही करचोरी आहे. त्यामुळेच ती परत केली जाऊ शकत नाही. जर पीयूष जैनला 52 कोटी रुपयांचा अतिरिक्त दंड भरायचा असेल तर डीजीजीआय तो स्वीकारेल.
इतिहासातील सर्वात मोठी कारवाईपीयूष जैनच्या कानपूर येथील निवासस्थानातून जप्त केलेले सूमारे 200 कोटी रुपये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) जमा करण्यात आले असून ते भारत सरकारकडेच राहतील, असे टंडन यांनी न्यायालयाला सांगितले. इतिहासातील सर्वात मोठ्या जप्तींपैकी एक आहे. DGGI ने कानपूर आणि कन्नौजमधील पीयूष जैनच्या ठिकाणांवर छापे टाकून 196 कोटी रुपयांहून अधिक रोख, 23 किलो सोने आणि 6 कोटी रुपयांचे चंदन तेल जप्त केले.