कोशांबी: स्वातंत्र्य दिनानिमित्त काल देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. उत्तर प्रदेशातल्या कोशांबीचे आमदार संजय कुमार गुप्ता यांनी तिरंगा यात्रेचं आयोजन केलं होतं. भाजप कार्यकार्त्यांसाठी आमदार गुप्तांनी मोफत पेट्रोल ठेवलं होतं. त्यासाठी भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले. आधी धक्काबुक्कीपर्यंत असलेलं प्रकरण नंतर थेट हाणामारीपर्यंत गेलं. कोखराज पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला.
तिरंगा यात्रेत गर्दी जमवण्यासाठी आमदार संजय कुमार गुप्तांनी मोफत पेट्रोल देण्याची घोषणा केली. त्यामुळे शेकडो लोक तिरंगा यात्रेत सहभागी होण्यासाठी पोहोचले. स्वत:चा जीव धोक्यात घालून लोक पेट्रोलच्या बाटल्या मिळवण्यासाठी धडपडत होते. यावेळी काही अनर्थ घडला असता, तर शेकडो लोकांच्या जीवावर बेतलं असतं. मात्र त्याची कोणतीही पर्वा न करता लोकांची मोफत पेट्रोलसाठी झुंबड उडाली.
कौशांबीतल्या चायल विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय कुमार गुप्ता यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा यात्रेचं आयोजन केलं होतं. यात्रेत मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन गुप्ता यांनी केलं होतं. भरवारीतल्या किड्सझी स्कूल कॅम्पसमधून यात्रा सुरू होणार होती. यात्रेत सहभागी होणाऱ्यांना मोफत पेट्रोल देण्याची घोषणा आमदारांनी केली होती. पेट्रोलच्या हजारो बाटल्या स्कूल कॅम्पसमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. तिरंगा यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी बाटल्या मिळवण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. परिसरात चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. पेट्रोलच्या बाटल्यांसाठी भाजप कार्यकर्ते भिडले. त्यांनी एकमेकांना मारहाणदेखील केली.