- हरीश गुप्तानवी दिल्ली - अमेठी, रायबरेली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याबाबत गांधी भावंडांनी अभ्यासपूर्ण मौन पाळले असतानाच प्रियंका यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी स्वत: निवडणूक रिंगणात उतरण्याची इच्छा व्यक्त करून संभ्रम वाढवला आहे.
या दोनपैकी एका जागेवरून आपण निवडणूक लढवावी, अशी उत्तर प्रदेशातील अनेक लोकांची इच्छा आहे, असे उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांनी सांगितले. आपण जनकल्याणासाठी काम करत आहोत, असाही दावा त्यांनी केला.
विशेष म्हणजे रॉबर्ट वाड्रा यांच्या या विधानावर गांधी घराण्यातील कोणीही भाष्य केलेले नाही. राहुल गांधी यांनी काल वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. तेव्हा त्यांनी रॉबर्ट वाड्रा यांचा हात हाती घेतला होता. यावेळी त्यांची बहीण प्रियंका गांधीही त्यांच्यासोबत होत्या. राहुल गांधी यांच्या जाहीर सभांत किंवा त्यांच्या यात्रांमध्ये रॉबर्ट वाड्रा कधीही दिसले नाहीत.
तूर्त घाई नाहीराहुल गांधी अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवणार नसल्याचेही समोर येत आहे. अमेठीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ३ मे अंतिम तारीख असल्याने उमेदवार जाहीर करण्याची तूर्त घाई नाही. राहुल अमेठीतून निवडणूक लढवणार की नाही, यावर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी थेट उत्तर दिले नाही. ते म्हणाले, “उमेदवार निवडताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. प्रचाराच्या रणधुमाळीतील व्यग्रता आणि इतर कारणे पाहता त्यांची उपलब्धता पाहावी लागेल,” असे ते म्हणाले. पक्ष काँग्रेसचे राज्यसभेतील उपनेते प्रमोद तिवारी यांची कन्या अनुराधा यांना उमेदवारी देण्याच्या विचारात आहे. १५ एप्रिलनंतर या दोन जागांवर निर्णय जाहीर होऊ शकतो.